आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे मेट्रो, विमानतळाचा विस्तार; केंद्राचा शरद पवारांच्या उपस्थितीत निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / पुणे - पुणे मेट्रो प्रकल्पास लवकरच मूर्तरूप येण्याची शक्यता अाहे. या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांचे काम सुरू करण्यात येईल, असा निर्णय बुधवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुण्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण व बायपासचे कामही लवकरच हाती घेण्याचा निर्णयही बैठकीत झाला.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील येथे महाराष्ट्र सदनात पुणे मेट्रो, विमानतळ व बायपासबाबत महत्त्वाची बैठक बुधवारी झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, नागरी उड्डयन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे या वेळी उपस्थित होते.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा अहवाल दिल्ली मेट्रो प्राधिकरणाने तयार केला होता. राज्य शासनाने त्यास २०१३ मध्ये तर फेब्रुवारी २०१४ मध्ये केंद्र शासनाने या प्रकल्पास तत्त्वत: मंजुरी दिली होती. पुणे मेट्रोच्या कामाबाबत एकमत होत नव्हते. बुधवारच्या बैठकीत भुयारी मार्ग, उड्डाणमार्गाबाबत निर्णय घेण्यात आले.

पुणे मेट्रोच्या दोन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी सुरू करणे, आवश्यक तिथे उड्डाणमार्ग व भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. शहरातून जाणाऱ्या नदीच्या बाजूने मेट्रोचे काम हाती घेण्यात यावे. लक्ष्मी रोड, कोथरूड, पुणे स्टेशन, बंडगार्डन हा मार्ग भुयारी असणार आहे त्यामुळे ६ हजार कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा ऑगस्ट २०१४ चा खर्च ११ हजार ८०० कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता. प्रकल्पास विलंब झाल्यामुळे त्यात वाढ होऊ शकते. राज्य व केंद्र शासन प्रत्येकी २० टक्के तर १० टक्के निधी महापालिका खर्च करणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी कर्ज स्वरूपात उभारण्यात येणार आहे.

पुणे बायपास कामही होणार
पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी बायपासबाबत बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाला. शहराची वाढती लोकसंख्या पाहता येत्या २५ वर्षांसाठी रिंग रोडचे नियोजन करावे, अशा सूचना गडकरी यांनी केल्या. पुण्यातून हैदराबाद, औरंगाबाद, बंगळुरू आदी शहरांसह विविध राज्यांना जोडणारे रस्ते, शहरातील दोन रिंग रोड आणि चांदणी चौकाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यामुंळे होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नांबाबत या बैठकीत चर्चा झाली. पुण्यातील चांदणी चौकाला ५ महत्त्वाचे रस्ते जोडले जातात. या चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक ठिकाणी भुयारी मार्ग व उड्डाणपूल बांधण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

पुणे-नाशिक सहापदरी, दिघी-जळगाववर चर्चा
दिघी (रायगड) ते जळगावपर्यतचा कोकण व जळगावला जोडणारा महामार्ग राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने पूर्ण करणे, पुणे-नाशिक ६ पदरी रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीस खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, शिवाजीआढळराव पाटील तसेच पुणे जिल्ह्यातील अन्य आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पिंपरीही येणार स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत
पिंपरी- चिंचवड महापालिकेला स्मार्ट सिटीतून वगळल्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. या वेळी शहराचे सादरीकरणच झाले नसल्याचे उघड झाले. सोबत आणलेले पत्र पवारांनी नायडूंना दिले. त्यावेळी शहराचा स्मार्ट सिटीत समावेशाचे आश्वासन व्यंकय्या नायडूंनी दिले.