आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Centre Has Taken Serious Note Of Pune Blasts: Sushilkumar Shinde ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्फोटाची पाळेमुळे शोधणार; सुशीलकुमार शिंदे यांचे पुण्यात आश्वासन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील बॉबस्फोटांची मालिका केंद्र सरकार आणि तपासयंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने घेतली असून, या प्रकरणाचे धागेदोरे मूळापासून शोधण्यात तपासयंत्रणा गुंतल्या असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याशिवाय त्यासंबंधी आताच माहिती देणे योग्य ठरणार नाही, असे सांगून शिंदे यांनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना बगल दिली.
पुण्यात एक ऑगस्ट रोजी वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर एकापाठोपाठ एक, असे चार स्फोट घडवण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर चौक, देना बॅँक, मॅक्डोनल्ड शॉप आणि गरवारे पुलानजीक अवघ्या 40 मिनिटांत झालेल्या स्फोटांनी पुणे हादरले होते.या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रिपदाची सूत्रे नुकतीच हातात घेतलेल्या शिंदे यांनी सायंकाळी पुण्यात पोलिस आयुक्तालयात केंद्रीय गृहसचिव आर. के. सिन्हा, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पोलिस महासंचालक संजीव दयाळ, पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासह उच्चपदस्थ पोलिस अधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पुण्यातील स्फोटांच्या तपासाच्या कामात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीसह महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉड, स्थानिक गुन्हे शाखा आदी तपास यंत्रणा गुंतल्या आहेत. स्फोटांच्या तपासात कार्यरत असलेल्या या यंत्रणांच्या तपासाविषयी कोणतीही माहिती देणे शोध पूर्ण झाल्याशिवाय देणे शक्य होणार नाही, याचा पुनरुच्चार करून शिंदे म्हणाले, तपासकार्यातील प्रगती तपास पूर्ण होण्याआधीच जाहीर केल्यास संंबंधित घटक सावध होण्याची शक्यता आहे. हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे. स्फोटाशी संबंधितांची पाळेमुळे खणून काढली जातील, असे शिंदे म्हणाले.
पद आणि स्फोट निव्वळ योगायोग - पुण्यात ज्या दिवशी स्फोट झाले, त्याच दिवशी मी केंद्रीय गृहमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली, तसेच त्याच दिवशी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक म्हणून संजीव दयाळ यांनीही सूत्रे स्वीकारली, हा निव्वळ योगायोग होता. त्याचा स्फोटांशी काहीही संबंध नाही. तसेच मुद्दाम त्याच दिवशी स्फोट घडवण्याचा हा कटही वाटत नाही, असा खुलासा सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना केला. माझा कार्यक्रम त्या दिवशी टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिरात होता आणि मी जंगली महाराज रस्त्याने जाणार नव्हतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तपास पूर्ण झाल्यावरच माहिती जाहीर करणार : मुख्यमंत्री - पुणे शहरात झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास विविध एजन्सीच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देखील स्फोटाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पुणे व मुंबईतून याबाबत तपास सुरू असून त्याबाबतची सविस्तर माहिती तपास पूर्ण झाल्यावरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी दिली.
मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्त व उच्चपदस्थ अधिकारी तसेच दहशतवाद विरोधी पथक यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, स्फोटाशी संबंधित साहित्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याबाबत माहिती देता येईल. तसेच सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. स्फोटात जखमी झालेले दयानंद पाटील यांच्या सुटकेबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, तपास सुरू असून तो
संपल्याशिवाय काही सांगता येणार नाही.