आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा व विदर्भात तुरळक पावसाची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला असून मराठवाडा आणि विदर्भाच्या जोडीने सांगली, साता-यानेही तापमानाची चाळिशी पार केली आहे. सरासरीच्या तुलनेत तापमानातील ही वाढ उल्लेखनीय
मानली जात असून, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांनी तापमानाची चाळिशी गाठली आहे. देशात शनिवारी सर्वाधिक तापमान राज्यातील ब्रह्मपुरी येथे 42.9 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. राज्यातील अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानातील अंतर कमी झाल्याने उकाड्यात विलक्षण वाढ झाली आहे. चटका देणारे ऊन आणि वाढता उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. चाळिशी गाठलेल्या आणि ओलांडलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव, नांदेड, अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी यांचा समावेश आहे. येत्या 48 तासांत हवामान मुख्यत: कोरडे राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे.

प्रमुख शहरांतील तापमान
ब्रह्यपुरी 42.9, अमरावती 42.6, अकोला 42.1, गोंदिया 41.3, नागपूर - 42.5, सोलापूर 41.6, सातारा 41.4, सांगली 41.2, जळगाव 41.5, मालेगाव 42, औरंगाबाद 39.6, नांदेड 41, चंद्रपूर 41.4, नाशिक 37.9, पुणे - 37.9, कोल्हापूर 39, मुंबई 35.5, महाबळेश्वर 32.8