आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - प्रसारमाध्यमांमधील वाढती स्पर्धा, एकांगी वार्तांकन, टीआरपीसाठी सनसनाटी देण्याची धडपड यामुळे सत्यता न पडताळताच बातम्या देण्याची वृत्ती वाढत आहे. पेड न्यूज आणि महसूल देणार्या जाहिरातींचा वरचष्मा या सार्यांचा एकत्रित परिणाम म्हणून माध्यमांची विश्वासार्हता प्रश्नचिन्हांकित बनली आहे, असे मत द हिंदू या दैनिकाचे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी येथे व्यक्त केले.
पत्रकार व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानात ते ‘माध्यमांची विश्वासार्हता : वास्तव आणि अवास्तव’ या विषयावर बोलत होते. महापौर वैशाली बनकर, खासदार सुरेश कलमाडी, डॉ. नीलम गोºहे, वंदना चव्हाण, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक रोहित टिळक, उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, आमदार गिरीश बापट, जयदेव गायकवाड, पोलिस आयुक्त गुलाब पोळ, दिव्य मराठीचे सल्लागार संपादक यमाजी मालकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी उस्मानाबाद येथील पत्रकार महेश पोतदार यांना पहिला व्यंकटेश चपळगावकर स्मृती पुरस्कार देण्यात आला.
वरदराजन पुढे म्हणाले, समाजातील चांगले-वाईट जोखण्याची जबाबदारी पत्रकारितेची आहे. लोकांपर्यंत योग्य ते पोहोचवण्याचे काम पत्रकारांचे आहे. विविध सामाजिक समस्यांना माध्यमांच्या व्यासपीठावर जागा मिळवून देणे आवश्यक आहे. मात्र, माध्यमांनी थेट न्यायाधीशांची भूमिका करू नये. त्यांनी समाजमनाचा आरसा बनले पाहिजे. बर्या-वाईटाचे, योग्य-अयोग्याचे प्रतिबिंब दाखवले पाहिजे. यासाठी बाह्य नियंत्रणापेक्षाही स्वत:शी असलेली न्याय्य गोष्टींची बांधिलकीच निर्णायक ठरावी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.