आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Chavan Positive For Maratha Reservation, Latest News

मराठा आरक्षणासाठी ठोस पावले- मुख्यमंत्री चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने ठोस पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी शिवनेरी गडावर छत्रपती शिवरायांच्या साक्षीने दिले. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केले. या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, विनायक मेटे, युवराज संभाजीराजे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजातील शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. काही अपवाद वगळल्यास या समाजातील फार कमी लोक नोकºया, उद्योगातही उच्च पदावर आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. त्याबाबतची कार्यवाहीही सुरू आहे. पण आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन कसोट्यांवर टिकावा, त्यावर कोणताही वाद निर्माण होऊ नये याची काळजी सरकार घेत असल्याचे ते म्हणाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विनायक मेटे, युवराज संभाजीराजे, पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वेक्षण अंतिम टप्प्यात
मराठा समाजातील विद्यार्थी, शासकीय कर्मचारी- अधिकारी यांच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने उत्कृष्ट काम केले आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठोस पावले टाकली जात असल्याचे चव्हाण म्हणाले.
किल्ल्यांचे संवर्धन
राज्यातील किल्ले संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. नव्या पिढीसमोर किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहास जिवंत ठेवण्याचा उद्देश आहे. जादा निधीची तरतूद करून या कार्यक्रमास गती दिली जाईल. शिवनेरी परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. राज्यातील सर्व गडांची माहिती पर्यटकांना समजेल, अशा पद्धतीने लावण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
स्मारकही लवकरच
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे. हे स्मारक जगातील उत्कृष्ट स्मारक व्हावे यासाठी जगभरातून स्मारकासाठी संकल्पना मागवण्यात येणार आहेत. लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.