आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चिकन\'च्या खपात तीस टक्क्यांनी वाढ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आखाड (आषाढ) आणि इफ्तार पार्ट्यांमुळे कोंबड्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. चिकनच्या खपात थेट तीस टक्क्यांची, तर अंड्यांच्या विक्रीत वीस टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.


येत्या सहा ऑगस्टला गटारी अमावास्या आणि ९ ऑगस्टला रमजान ईद आहे. सात ऑगस्टला श्रावण महिना सुरू होतो आहे. श्रावण येईपर्यंत अंडी-चिकनच्या बाजारातील तेजी टिकून राहणार आहे. श्रावणापूर्वी येणारा आषाढ, डिसेंबर महिना आणि उन्हाळ्यातील होळीचा काळ या वर्षातील तीन प्रसंगी चिकन-अंड्यांचा खप मोठ्या प्रमाणात वाढतो. याचा लाभ घेण्याचे नियोजन चिकन उत्पादकांनी केले आहे.


वेंकटेश्वरा हॅचरीजचे उपमहाव्यवस्थापक (विक्री) डॉ. पी. जी. पेडगावकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, सोयाबीन आणि मक्याच्या किमती महागल्याने चिकन उत्पादनाचा खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आखाड आणि इफ्तारमुळे वाढणा-या चिकन विक्रीचा फायदा उठवण्याची संधी उत्पादकांसमोर आहे. आषाढी एकादशीच्या आधीचा पंधरवडा चिकन-अंडी खपाच्या दृष्टीने चांगला गेला. एकादशीनंतर आता पुन्हा चिकन-अंड्यांची मागणी वाढली आहे. मे-जूनमधील चिकन विक्रीशी तुलना करता श्रावण उजाडेपर्यंतच्या महिन्यात राज्यात 2.7 कोटी चिकनची विक्री होईल.


नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीचे सदस्य राजू भोसले म्हणाले, की राज्यातील अंडी उत्पादन मागणीपेक्षा कमी आहे. राज्यात दररोज सुमारे 1.2 कोटी अंड्यांचे उत्पादन होते. गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या शेजारी राज्यांमध्ये होणारी किरकोळ विक्री लक्षात घेता दररोजची राज्याची मागणी मात्र 2.2 कोटी अंड्यांची आहे.


तंदुरी चिकन लोकप्रिय
बाराशे ते तेराशे ग्रॅम वजनाच्या अख्ख्या कोंबड्यांचा उपयोग तंदुरीसाठी केला जातो. शहरांमधून आणि हॉटेल उद्योगाकडून शनिवार-रविवारी चिकन तंदुरीसाठी योग्य अशा छोट्या कोंबड्यांची मागणी जास्त असते. आखाड किंवा इफ्तार पार्ट्यांमधून ‘सर्व्ह’ करण्यासाठी तंदुरी चिकन अधिक आकर्षक असते. खवय्यांमध्येही चिकन तंदुरीची लोकप्रियता जास्त आहे. चिकनच्या इतर पदार्थांसाठी दोन-सव्वादोन किलो वजनाची नेहमीची कोंबडी वापरली जाते.


एका कोंबडीमागे उत्पादकाला 70 रु.
एक किलो वजनाची कोंबडी विकल्यानंतर उत्पादकाला सत्तर रुपये मिळतात. याच कोंबडीसाठी ग्राहकाला 95 ते 100 रुपये मोजावे लागतात. याच कोंबडीची कापून, स्वच्छ करून (ड्रेस्ड् चिकन) विक्री केल्यास किंमत 135 ते 155 रुपये प्रतिकिलो होते. श्रावण सुरू झाल्यावर चिकन-अंड्यांच्या खप सध्याच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा पोल्ट्री तज्ज्ञांचा अंदाज आहे.


पावसाळ्यात जरा जपूनच
वर्षा ऋतुत खरे तर मांसाहार न करण्याचाच सल्ला देईन, तरीही मांसाहार घ्यायचाच असेल भरपूर शिजवलेले मांस दुपारी खाण्यास हरकत नाही. रात्रीच्यावेळी मांसाहार टाळलेला बरा. रोजच्या दिनचर्येत शारीरिक हालचाल, व्यायाम, चालणे यांचा समावेश नसेल तर मांसाहारामुळे पचनाच्या तक्रारी, पोटाचे विकार, आळस येणे आदी तक्रारी उद्भवू शकतात.’’ डॉ. गौरव दवे, आयुर्वेदतज्ज्ञ.