आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chilling Continue In State, Very Low Temparture Recorded In Nagar

राज्यात थंडीची लाट कायम राहणार, नगरमध्‍ये सर्वात कमी तापमानाची नोंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - डिसेंबर महिना राज्यात थंडीची लाट घेऊन आला असून अनेक गावे गारठू लागली आहेत. गेल्या चोवीस तासांतील नीचांकी तापमानाची नोंद नगर येथे 6 अंश सेल्सियस इतकी झाली असून औरंगाबादचा पारा 11 अंशावर गेला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमधील रात्रीचा पारा दहा अंशांच्या खाली उतरू लागला आहे. राज्यातील थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले की, बंगाल उपसागराच्या नैर्ऋत्येला असलेल्या ‘मडी’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली असली तरी ते उत्तरेकडे सरकत आहे. येत्या बारा तासांत या चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार आहे. अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. पुढच्या 48 तासांत राज्यातील आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून किमान तापमानात मोठी घट अपेक्षित आहे. गेल्या चोवीस तासांत विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली होती.
मराठवाड्याच्या काही भागांत थंडीचा जोर अधिक होता. तुलनेने खान्देशातील तापमान सरासरीच्या जवळपास असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
दरम्यान, उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडीची जोरदार लाट आली असून पंजाब, हिमाचल प्रदेशातील अनेक गावांमधील तापमान पाच अंशांच्या खाली गेले आहे. देशाच्या पठारी भागातील नीचांकी तापमानाची नोंद पंजाबातील आदमपूर येथे 4.4 अंश झाली.