आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chorus Seeking Answers For Missing Voters' Names Grows News In Divya Marathi

मतदानाच्या हक्कासाठी संतप्त पुणेकर रस्त्यावर; जिल्हाधिकारी म्हणाले, ‘वेट अँड वॉच’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मतदार यादीतून नावे वगळल्यामुळे फटका बसलेल्या शेकडो पुणेकर मतदारांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून भोंगळ कारभाराबाबत प्रशासनाला जाब विचारला. मतदारांच्या उद्रेकापुढे नरमलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे त्यांना आवाहन केले. दरम्यान, भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनीही दिवसभर उपोषण करून सरकारी कारभाराचा निषेध केला.

मतदार यादीतील चुकांमुळे मतदानाचा हक्क न बजावू शकलेल्या मतदारांना तातडीने मतदान करू द्यावे, मतदार यादीतील चुकांना कारणीभूत असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना कडक शासन करावे, या प्रमुख मागण्यांची शेकडो निवेदने अनेक संस्था-संघटनांनी प्रशासनाला दिली.

17 तारखेला पुण्यात लोकसभेसाठी मतदान झाले. 2009 च्या तुलनेत यंदा सुमारे 15 टक्के अधिक मतदान झाले. मतदानाचा उत्साह असतानाच जवळपास सव्वा लाख लोकांना मात्र यादीत नावे नसल्याने मतदान न करता परत जावे लागले. यामुळे गुरुवारी रात्रीपासूनच शेकडो मतदार विधान भवनापाशी आंदोलनाच्या पवित्र्यात होते. शुक्रवारी हे आंदोलन संघटित स्वरूपात सुरू झाले.

मतदार यादीत जाणीवपूर्वक घोळ घालण्यात आल्याचा संशय भाजप, मनसे आणि आम आदमी पार्टीने व्यक्त केला आहे. प्रशासनातील अधिकारी या कटात सामील असून त्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी
गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

न्यायालयाचा दाखला : निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला असून ‘निवडणूक प्रक्रिया सुरू असताना एखादा प्रसंग असा घडतो की, ज्यामुळे काही प्रश्न निर्माण होतात. ज्याबाबत पुरेशा कायदेशीर तरतुदी नाहीत किंवा ज्याबाबत कायद्यात स्पष्टता नसते, अशा वेळी योग्य निर्णय घेण्याचे अधिकार घटनेने निवडणूक आयोगाला दिले आहेत,’ हा दाखला पुणेकरांनी प्रशासनाला दिला.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीही आंदोलनात: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे मतदानापासून वंचित राहिलेल्याना पुन्हा संधी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी दिला.

मतदार यादीत नावे नसल्याने जनमत संतप्त असल्याची जाणीव उशिरा झालेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीनेही आंदोलनात उडी घेतली. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, कॉँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांनीही लेखी आक्षेप प्रशासनाकडे नोंदवले आहेत.

प्रशासनाचा हास्यास्पद खुलासा
मतदार यादीतील गोंधळाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी केलेला खुलासा हास्यास्पद असल्याची टीका क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली. ते म्हणाले, प्रारूप मतदार यादी अद्ययावत असणे, त्यात सर्वांची नावे समाविष्ट असणे, नाव, छायाचित्र व पत्ता अचूक असणे ही जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही काय? निवडणूक आयोगाने ज्यांना व्होटर आयडी कार्ड दिले, ज्यांना वोटर स्लीपदेखील मिळाल्या, ज्यांची नावे प्रारूप यादीत होती, अशांची नावे गायब होण्यामागे नक्कीच काळेबेरे असण्याचा संशय आहे.’

चौकशीसाठी पोलिसांत तक्रार
या गैरप्रकाराबाबत पुण्यातील जागरूक नागरिक संजय वसंत पायगुडे यांनी थेट लाचलुचपत विरोधी पथकाकडे (एसीबी) तक्रार करून जाणीवपूर्वक मतदार यादीतील नावे वगळणार्‍या अधिकार्‍यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

कोर्टात जाण्याचा इशारा
‘लोकशाही हक्कापासून वंचित ठेवलेल्या प्रशासनाविरोधात पुणेकर न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाहीत,’ असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर म्हणाले. ‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’चे निमंत्रक दीपक बीडकर आणि सचिव ललित राठी यांनी मतदार यादीतील त्रुटी ही गंभीर बाब आहे.

तक्रारी आयोगाकडे
‘सर्व तक्रारी सकृतदर्शनी योग्य असल्याने त्या माझ्या सकारात्मक टिप्पणीसह राज्य निवडणूक आयोगामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवल्या जातील. आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही होईल.’- सौरव राव, जिल्हाधिकारी