आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टरवरून पुणे विद्यापीठात दोन गटांत तुंबळ हाणामारी, परस्पर तक्रारीनंतर दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी रात्री विरोध प्रदर्शन करताना एबीव्हीपी विद्यार्थी - Divya Marathi
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी रात्री विरोध प्रदर्शन करताना एबीव्हीपी विद्यार्थी
 पुणे - पोस्टर लावण्याच्या वादातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांच्या दोन गटांत झालेल्या जोरदार हाणामारीचे पडसाद शनिवारी विद्यापीठात उमटले. दोनच दिवसांपूर्वी नॅकने विद्यापीठाला दिलेल्या ‘ए प्लस’ या अभिमानास्पद दर्जाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रकार खेदजनक असल्याचे अनेकांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.  त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
  
कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, ‘विद्यापीठ आवारात झालेल्या या प्रकारामुळे मी व्यथित झालो. असे प्रकार विद्यापीठात शोभत नाहीत. वैचारिक आदान-प्रदान आणि बुद्धिप्रामाण्यवाद यासाठी विद्यापीठ आहे. प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे; पण तो अधिकार कायद्याच्या, घटनेच्या आणि माणुसकीच्या चौकटीतच वापरला पाहिजे. यापुढे हाणामारीसारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही  त्यांनी या वेळी सांगितले.
 
आमदार परिचारकांच्या वक्तव्याविरोधात SFI चे पोस्टर 
- नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक प्रचारात सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
- याविरोधात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने 27  फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठीचे पोस्टर विद्यापीठात लावले गेले. 
- एसएफआयच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की आम्ही पोस्टर लावत असताना एबीव्हीपीचे जवळपास 200 कार्यकर्ते आले आणि त्यांनी काहीही विचारपूस न करता आमच्यावर हल्ला केला.  

परिचारकांनी मागितली माफी 
- सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरमधील भोसी येथील प्रचारसभेत म्हटले होते, 'पंजाबमधील सैनिक सीमेवर लढत असतो. वर्ष-वर्ष तो घरी येत नाही. मात्र जेव्हा त्याला घरून निरोप येतो की तुम्हाला मुलगा झाला तेव्हा तो पेढे वाटतो. पण वर्षभर तो घरीही गेलेला नसतो.'
- भारतीय सैनिक आणि त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या या वक्तव्याने गदारोळ उठल्यानंतर परिचारकांनी माफी मागितली होती. 
 
 दिल्लीतही मारहाण 
दिल्लीतील रामजस कॉलेजमध्ये एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देशविरोधी आवाज उठवला जात असल्याचा आरोप करुन एबीव्हीपीने कॉलेज प्रशासनावर दबाव आणून सेमिनार रद्द केला होता. त्याविरोधात एसएफआयने आंदोलन केले होते. 
- या न झालेल्या एका सेमिनारमध्ये देशद्रोहाचा आरोप असलेला आणि एक वर्षानंतरही आरोपपत्र दाखल न झालेला उमर खालिद इतिहासाचा विद्यार्थी म्हणून पेपर सादर करणार होता. याशिवाय जेएनयूची माजी उपाध्यक्ष शेहला राशिदही निमंत्रित होती. 
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...