सातारा- सातारा परिसरातील आणेवाडी टोलनाक्याच्या वसुलीचे कंत्राट रिलायन्स कंपनीने स्थानिक आमदार शिवेंद्रराजे यांच्या समर्थकाला दिल्याच्या रागातून खासदार उदयनराजे व त्यांच्या समर्थकांनी मध्यरात्री राडा केला. खासदार उदयनराजे यांनी तर शिवेंद्रराजे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर दोन्ही समर्थकांत झालेल्या धुमचक्रीत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. यादरम्यान हवेत गोळीबार झाल्याचेही समोर येत आहे. सातारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी मध्यरात्री घटनास्थळी जात परिस्थिती नियंत्रणात आणली.
आणेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून साताऱ्यातील दोन्ही राजे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात हा राडा झाला. गेली अनेक काळ या दोघांत संघर्ष सुरु आहे. आणेवाडी टोलनाक्याचे कंत्राट गेली 12 वर्षे उदयनराजे यांच्या समर्थकांकडे होते. मात्र, नुकतेच रिलायन्स कंपनीने या टोलनाक्यावरील वसुलीचे काम उदयनराजेंच्या समर्थकांकडून शिवेंद्रराजे यांच्या समर्थकाला दिले. त्यामुळे उदयनराजे चांगलेच भडकले आहेत.
गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आणेवाडी टोलनाक्यावर आपल्या काही समर्थकांसह गेले. खासदारांनी तेथील कामगारांचा प्रश्न उपस्थित करत काल रात्री तेथे ठिय्या मांडला. रात्री 12 वाजेपर्यंत खासदार उदयनराजे टोलनाक्यावरच बसून राहिले त्यानंतर त्यांनी शिवेंद्रराजेला आता बघतोच असा धमकी दिली. त्यानंतर उदयनराजे रात्री उशिरा शिवेंद्रराजे यांच्या सुरूची या निवासस्थानाबाहेर आले. यावेळी त्यांच्यासमवेत समर्थक होते.
खासदार समर्थकांसह येताच आमदार शिवेंद्रराजे यांचेही समर्थक तेथे गोळा झाले. यानंतर दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. हा राडा हाणामारीतून गाड्याची तोडफोड करण्यापर्यंत गेला. दरम्यान, तेथे गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यावर अधिकृत कोणी काहीही बोलत नाहीये. खासदार समर्थकांच्या गाड्याची तोडफोड झाल्याचे कळते.
या राडेबाजीनंतर खासदार रात्री 1 च्या सुमारास आपल्या जलमंदिर या निवासस्थानी केले. तेथून त्यांनी पोलिस ठाणे गाठत पोलिसांत तक्रार दाखल केली. साता-याचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. दोन्ही बाजूनी तक्रार आल्यानंतर पहाटेपर्यंत प्रक्रिया सुरु होती. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
दरम्यान, या राडेबाजीनंतर रिलायन्स कंपनीने आमदार शिवेंद्रराजे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्याकडून दिवाळीनंतर काढून घेतले जाईल असे म्हटले आहे. उदयनराजे यांनीही दिवाळीनंतर माझा कंत्राटदारच टोलवसुलीचे काम करेल असे ठणकावून सांगितले.