पुणे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 40 वे अखिल भारतीय दोन दिवसीय अधिवेशन उद्यापासून भोसरीत सुरु होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनास देशभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, वेब मीडियामधील सुमारे 3000 पत्रकार उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांचे वेतन, पेन्शन याबाबतचे विषय परिसंवादात घेण्यात येणार आहेत. यात देशभरातील पत्रकार या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात 6 व 7 जूनला हे अधिवेशन होईल. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 6 जून रोजी सकाळी करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार होते. मात्र, दिल्लीतील एक महत्त्वाची बैठक आल्याने पवारांनी पिंपरीचा दौरा रद्द केला आहे. 7 जूनला अधिवेशनाचा समारोप होणार आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
खासदार साबळेंच्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन-
पिंपरी-चिंचवडचे खासदार अमर साबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेदहा केले जाणार आहे. पुणे-मुंबई महामार्गावर दापोडीतील कोहली टॉवर्स येथे हे कार्यालय उभारण्यात आले आहे. शरद पवार पिंपरी-चिंचवड शहरात ब-याच कालावधीनंतर येणार असल्याने विविध विकासकामांचे उद्घाटन व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार होते. मात्र, पवारांनी दौरा रद्द केल्याने हे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.