आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत शेतीसाठी पायाभूत गुंतवणुकीवर भर : मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘शाश्वत शेतीसाठी पाणी आणि विजेबरोबरच शेतीमध्येही पायाभूत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून एकाच वर्षात २४ टीएमसी पाणीसाठा विकेंद्रित स्वरूपात निर्माण झाला आहे. उत्पादन होणाऱ्या ठिकाणी कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याचे शासनाचे धोरणही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच राबवले जात आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत लिखित ‘बळीचा आक्रोश’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. गृह राज्यमंत्री प्रा.राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, खासदार राजू शेट्टी,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख,खोत, चित्रपट निर्माते कैलास वाणी आदी उपस्थित हाेते. या वेळी वाणी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख ११ हजाराचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

दु:ख समजून घ्या : शेट्टी
स्वाभिमानी संघटनेचे खासदार शेट्टी म्हणाले की, ‘शेतकऱ्याच्या मालाची थोडी जरी किंमत वाढली तरी मोठा गाजावाजा होतो. शेतकऱ्याला स्वत:च्या मालाची किंमत ठरवता येत नाही हे मोठे दु:ख आहे. शेतकऱ्याला खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असा आतबट्टयाचा व्यवहार करावा लागतो. शहरातील जनतेनेही शेतकऱ्यांचे हे दु:ख जाणून घेतले पाहिजे.’

खोत म्हणाले की, ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख जाणून घेऊन त्यावर फुंकर घालण्यासाठी काही मदत करता येते का हे पाहण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ दिलासा यात्रा काढली होती. त्यामध्ये मराठवाडा व विदर्भातील दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांचे विदारक चित्र नजरेसमोर आले. त्यातूनच हे पुस्तक आकारास आले आहे.’