आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची अपेक्षा; शेतकऱ्यांच्या कुटुंबांची जबाबदारी समाजाचीही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी जे जे करता येईल ते ते शासन करीत आहेच, मात्र ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजानेही त्यांना आधार देण्यासाठी पुढे यावे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात केले. ‘शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे. आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही अशा प्रकारचे मोठे कार्य करून दाखवण्याची जिद्द बाळगा’, असा संदेशही फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील ७०० मुले-मुली मेळघाट ठाणे परिसरातील ३०० आदिवासी मुलांना भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पांतर्गत शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश देण्यात अाला. मुख्यमंत्र्यांनी या मुलांचे स्वागत केले. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था आदी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गेल्या दोन-तीन वर्षांत राज्यात झालेल्या अल्प पावसामुळे खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झाली अाहे. राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करीत आहे. मात्र, आपत्तीचे स्वरुपच मोठे असल्यास समाजानेही शासनाच्या हातात हात घालून काम केल्यास आपत्तीग्रस्तांना दिलासा मिळून त्यांना जगण्याची नवी उमेद मिळू शकेल. विदर्भात शेतकरी मोठ्या नैराश्यात असताना यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी कुटुंबीयांसाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविले होते. त्याचा परिणाम म्हणून गेल्यावर्षीपेक्षा ५० टक्क्यांहून आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र सर्वत्रच आत्महत्या कमी बंद कशा होतील यादृष्टीने शासनाचे काम राहणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या त्यातील मुलांच्या पुनर्वसनासाठी शासन प्रयत्न करत आहेच. मात्र भारतीय जैन संघटना अशाच संघटना करीत असलेल्या प्रयत्नांमुळे या मुलांना मोठे बळ मिळणार आहे, अशी अाशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पालकत्व गमावलेल्या मुलांची जबाबदारी स्वीकारणे हे समाजाचे कर्तव्य ठरते. शांतीलाल मुथ्था यांनी समाजाची भूमिका स्वीकारुन या मुलांची, कुटुंबाची जबाबदारी एक पित्याच्या रुपात स्वीकारली, हे त्यांचे मोठे कार्य आहे, असे गाैरवाेद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

शांतीलाल मुथ्था म्हणाले की, या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी राज्यातील २६ जिल्ह्यांत सर्वेक्षण करुन चालू शैक्षणिक वर्षात ९०० हून अधिक मुलांना शाळेत दाखल करुन घेतले आहे. अजूनही जुलैपर्यंत शंभरपेक्षा जास्त मुलांचे प्रवेश होतील. संस्थेत आदिवासी भागातील, नक्षलग्रस्त भागातील, जम्मू काश्मीर भूकंपग्रस्त, जबलपूर भूकंपग्रस्त मुलांचेही शिक्षण झाले आहे. आत्महत्येसाठी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागणारी बीड जिल्ह्यातील महिला अनिता देवकुळे त्यांच्या तीन मुली नम्रता, सिमरन आणि सोनाली यांचे पालकत्व जैन संघटनेने स्वीकारले अाहे. देवकुळे यांना संस्थेत नोकरी देण्यात आली.’ दरम्यान, अमृता फडणवीस यांनी विविध चित्रपटात कामासाठी मिळालेल्या मानधनाची रक्कम वंचित मुलांच्या शिक्षणासाठी या वेळी संस्थेला सुपूर्द केली.