पुणे- “खोटा प्रचार करून भाजपच्या बदनामीची मोहीम विरोधकांनी चालवली आहे; पण कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची गावोगावची प्रकरणे खणून काढावीत. तक्रारी कराव्यात, आम्ही तर अग्निपरीक्षा देऊच पण नैतिकता नसलेल्या ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या नेत्यांचेही बुरखे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाच्या दोनदिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे उद््घाटन शनिवारी केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांच्या हस्ते पुण्यात झाले. या वेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षस्थानी होते. सुमारे पाऊण तासाच्या जोशपूर्ण भाषणात फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांवरील आरोप खोडून काढले. ते म्हणाले, “भाजपच्या कार्यकाळात कुठलेही घोटाळे झालेले नाहीत. त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. आमच्या मंत्र्यांवर भूखंड लाटल्याचे आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आजवर लाटलेले सरकारी भूखंड परत करावेत.”
सरकारच्या विरोधात कोणतीही ठोस गोष्ट सापडत नसल्याने गोबेल्स नीतीनुसार हवेत बाण मारले जात आहेत. मात्र, आमचे सरकार प्रामाणिकपणेच काम करेल, असा विश्वास मी जनतेला देऊ इच्छितो. भाजपला निवडून दिल्याचा जनतेला अभिमान वाटेल, अशीच कामगिरी हे सरकार करून दाखवेल. ज्या दिवशी आम्ही भ्रष्टाचार अंगीकारू त्याच दिवशी आम्ही घरी जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना सांगितले. या वेळी पदाधिकारी उपस्थित होते.
व्यासपीठावर मंत्र्यांची गर्दीमंत्रिपदाचा नुकताच राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसे यांना व्यासपीठावर दानवे यांच्या शेजारी मानाने बसवण्यात आले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, नवनिर्वाचित खासदार विनय सहस्रबुद्धे आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. भाजपचे राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत. विधान परिषेदत नुकतीच निवड झालेले सुजितसिंह ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला.
नरेंद्र-देवेंद्र "खाते नहीं, खाने देते नहीं..'
“दिल्लीत ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी प्रामाणिकता आणि कार्यक्षमतेचा आदर्श घालून दिला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत स्वच्छ कारभार चालवला आहे. फडणवीसांनी गेल्या पावणेदोन वर्षांत स्वत:चे वजन घटवले असले तरी जनतेसाठी खूप कमावले आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ‘नरेंद्र-देवेंद्र’ हे दोघेही ‘खाते नहीं और खाने देते नहीं’. म्हणूनच त्यांच्याविरोधात अपप्रचार केला जातो. कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे परंतु विनम्रतेने ही वस्तुस्थिती लोकांमध्ये जाऊन सांगितली पाहिजे,' असे वेंकय्या नायडू म्हणाले.
पुढील स्लाइडवर वाचा, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात 'लोकमान्य'
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)