आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Prithviraj Chavan & Ncp Conflicts Drama Continues In South Karad Assembly

राष्ट्रवादी विलासकाका उंडाळकरांसोबतच; पृथ्वीबाबांचा \'काटा\' काढण्याची मोहिम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दक्षिण कराड मतदारसंघातून काँग्रेसचे विदयमान आमदार विलासकाका उंडाळकर यांचे तिकीट कापल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसने उंडाळकर यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी दिल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केलेले राजेंद्र यादव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गोटात प्रवेश करीत आज अखेरच्या दिवशी अर्ज माघारी घेतला. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीने विलासकाका उंडाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. पृथ्वीराज चव्हाणांना दक्षिण कराडमध्येच अडकवून ठेवायचे, पराभूत करण्यासाठी सर्व डावपेच आखायचे व राज्याचे मैदान मारायचे अशी रणनिती राष्ट्रवादीने ठरविल्याचे बोलले जात आहे. पृथ्वीराज चव्हाणांना आता उंडाळकर यांच्यासह भाजपचे अतुल भोसले व शिवसेनेचे अजिंक्य पाटील यांचे आव्हान असेल.

शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात जुनात राजकीय वाद- शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात राजकीय सख्य कधीच राहिले नाही. पृथ्वीराज चव्हाणांना राजीव गांधींनी काँग्रेसमध्ये आणल्यावर पवारांच्या राजकीय चलाखीबाबत ते नेहमीच राजीव यांना माहिती देत असत. त्यामुळे राजीव गांधी पवारांना नेहमीच हाताच्या अंतरावर ठेवत असत. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचे सरकार कसे पाडले व इंदिरांना विरोध करीत काँग्रेसचे नुकसान कसे केले याची इंत्थभूत माहिती पृथ्वीराज यांच्या माध्यमांना राजीव यांना मिळाली होती. त्यामुळे पवारांना पृथ्वीराज चव्हाण हे नेहमीच आपल्या मार्गातील अडथळा वाटत राहिले आहेत. 1991, 1996 व 1998 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांनी कराड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, पवारांनी प्रत्येक वेळी त्यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले. मात्र पवारांना त्यावेळी यश आले नाही. मात्र, 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी मात्र राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील यांनी पृथ्वीबाबांना पराभूत केले. त्यावेळी पवारांनीच बारीक लक्ष देऊन पृथ्वीराजबाबांचा काटा काढल्याचे सर्वांनाच माहित आहे.
पृथ्वीराज चव्हाण चार वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीहून मुंबईत आले. मागील चार वर्षाच्या काळात पृथ्वीबाबांनी त्याचे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादीला खिळखिळी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यात त्यांना ब-यापैकी यश आल्याचे मानले जात आहे. याचमुळे भाजप-शिवसेनेची 25 वर्षाची अभेद्य युती तुटताच राष्ट्रवादीने तासातच आघाडी तोडत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी इतक्या दिवस राजकीय गरज म्हणून पृथ्वीबाबांचा त्रास सहन करीत होती. मात्र संधी मिळताच शरद पवार व अजित पवार यांनी सवतासुभा उभारला आहे.

पृथ्वीराज चव्हाण आता दक्षिण कराडमधून विधानसभेच्या रिंगणात उतरताच राष्ट्रवादी परतफेड करण्याच्या तयारीत आहे. चव्हाणांना विधानसभेत पराभूत केल्यास त्यांच्या नेतृत्त्वाचा प्रश्न निकालात काढून पृथ्वीबाबांना 'चेकमेट' देण्याची राष्ट्रवादीची रणनिती आहे. चव्हाण यांना तिकीट देताना काँग्रेसने सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले विलासकाका उंडाळकर यांचे तिकीट कापले. त्याचा राग मनात ठेवून उंडाळकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीने राजेंद्र यादव यांना तिकीट दिले. मात्र, मागील दोन दिवसात मुख्यमंत्री चव्हाण यांनी राजेंद्र यादव यांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले. त्यानुसार यादव यांनी आज अखेरच्या दिवशी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी ऐन युद्धात तोंडावर आपटली पण राष्ट्रवादीने लागलीच उंडाळकरांना पाठिंबा देत चव्हाणांविरूद्ध 'मोहिम' राबविणार असल्याचेच जाहीर केले.