आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाला 5 कोटींचा निधी देणार- पृथ्वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: पुणे शहरातील महात्मा फुले यांच्या वाड्याशेजारीच बांधण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.)
पुणे- अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जीवावर उदार होऊन समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचे फार मोठे धाडस ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले असे गौरवोद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात काढले. सावित्रीबाई फुले स्मारकाच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पुणे शहरातील महात्मा फुले यांच्या वाड्याशेजारीच बांधण्यात आलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून स्मारकातील प्रकल्पाचे उर्वरित काम करण्यासाठी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल, यासाठी महापालिकेने त्वरित कामाचा आराखडा तयार करून पाठवावा. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांची स्मारके जोडली जावीत, जेणेकरून या स्मारकामुळे नव्या पिढीला प्रेरणा व दिशा मिळण्यास मदत होईल. फुले कुटुंबियांचे शिक्षणातील महत्वपूर्ण योगदान लक्षात घेऊनच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, सावित्रीबाई फुलेंचे व्यक्तिमत्व आगळे वेगळे होते. या कुटुंबीयांनी समाजाला आधुनिकतेचा संदेश व दृष्टी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, अंधश्रद्धेविरुद्ध समाजात जनजागृतीसाठी व स्त्री शिक्षणात पुढाकार, बाल विवाह प्रतीबंधाबाबत समाजामध्ये चळवळ उभी करून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सावित्रीबाई या उत्तम लेखिका होत्या व त्यांचे फुले काव्य प्रसिद्ध आहे. शूद्रांना शिक्षण मिळाले पाहिजे व शुद्रावरचा डाग काढण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला, असे पवार यांनी भाषणात सांगून सत्यशोधक समाजाचे नेतृत्वही त्यांनी केले त्या कर्तुत्वसंपन्न होत्या अशा शब्दात कौतुक केले. बऱ्याच वर्षापासून रखडलेले काम पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांनी महापालिका व राज्य सरकारला धन्यवाद देत हे स्मारकामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे सांगितले.
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात फुलेंच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर सावित्रीबाई फुले यांचे सुंदर स्मारक उभारण्यात आले आहे, असे सांगून 2003 मध्ये या स्मारकाचे माझ्या हस्ते भूमिपूजन झाले होते याची आठवण करून दिली. अद्यापही स्मारक परिसरातील बरीच कामे अपूर्ण आहेत त्यासाठी निधीची अत्यंत गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले. फुले यांच्या जीवनाचा समग्र आढावा भुजबळ यांनी आपल्या भाषणात घेऊन त्यांच्या अंगी स्वकर्तृत्व कसे होते याची माहिती दिली.