पुणे- काँग्रेसमध्ये नेतृत्त्वबदलाबाबत वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत. मात्र मला हायकमांडकडून तसा कोणताही निरोप नाही. हायकमांड जे काही निर्णय घेईल ते मला मान्य असेल. तोपर्यंत मी राज्यातच काम करीत राहणार आहे असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिले. सध्या वर्तमानपत्रात आसाम, हरियाणासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलाचे वारे असल्याचे बातम्या येत आहेत. याबाबत पत्रकारांनी चव्हाण यांना छेडले असता त्यांनी नेतृत्त्वबदलाबाबतची शक्यता जवळपास फेटाळूनच लावली आहे. मात्र, जे निर्णय होतील ते वेळोवेळी तुम्हाला कळविले जातील असे सांगत सावध भूमिका घेतली.
चव्हाण म्हणाले, राज्यात नेतृत्त्वबदलाबाबत माझ्याशी आमच्या पक्षातून किंवा हायकमांडकडून कोणतीही विचारपूस केलेली नाही. जे काही सुरु आहे ते वर्तमानपत्रात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा अनपेक्षित असा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आम्ही हायकमांड यांच्याकडे राजीनाम्याची तयारी दर्शिवली होती. पक्षसंघटनेसाठी आवश्यक ते सर्व बदल करावेत असे आम्ही सर्वांनी पक्षनेतृत्त्वाला सांगितले होते. आता मात्र पुन्हा बातम्या येत आहेत. याबाबत मला काहीही माहिती नाही. पक्षनेतृत्त्व जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडू अगदी पक्षसंघटनेतही काम करू असे सांगत चव्हाण यांनी गांधी घराण्यावरील निष्ठा दाखवली.
राज्यात आगामी दोन-तीन महिन्यात निवडणुका आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी शरद पवार यांनी चर्चा केली आहे. याबाबत पवार आणि माझीही चर्चा झाली आहे. निवडणुकीआधी काय करावे याबाबत चर्चा झाली. मात्र नेतृत्त्वबदलाबाबत चर्चा झाली काय याबाबत सांगू शकत नाही असे चव्हाणांनी स्पष्ट केले. तसेच जे काही निर्णय होतील ते तुम्हाला वेळोवेळी कळविले जातील असे सांगत चव्हाणांनी जाताजाता पत्रकारांना
गुगली टाकली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांसाठी राज्यात नेतृत्त्व बदलले जाईल असे वाटत नाही असे म्हटले आहे. तर, राष्ट्रवादीकडूनही याबाबत कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे राज्यात नेतृत्त्व बदलाचे वारे ही पुन्हा एकदा बातमीच ठरणार की तसे घडणार हे आठवडाभरात स्पष्ट होईल. दरम्यान, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे केवळ दोन महिन्यांसाठी मुख्यमंत्री होण्यास इच्छूक नसल्याचे कळते.