आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोेची एेतिहासिक कामगिरी : ‘स्वयम’ची भरारी, 'सीओईपी’त जल्लोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) इतिहासात २२ जून २०१६ हा दिवस ऐतिहासिक ठरला. इस्रोतर्फे बुधवारी तब्बल २० उपग्रह एकाच वेळी एकाच प्रक्षेपकाच्या साहाय्याने अंतराळात झेपावले, तेही वेगवेगळ्या कक्षांमध्ये... आणि हाच क्षण पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीअाेईपी) इतिहासातही नोंदला गेला. कारण या २० उपग्रहांपैकी सर्वात लहान आकाराचा स्वयम उपग्रह ‘सीओईपी’च्या विद्यार्थ्यांचा होता. संपूर्णपणे विद्यार्थ्यांनी तयार केलेला आणि संपूर्ण देशी बनावटीचा!

बुधवारी सकाळी ९ वाजेपासूनच ‘सीओईपी’मधील वातावरणात उत्सुकता आणि कुतूहलाने दाटले होते. ‘स्वयम’ची कोअर टीम श्रीहरिकोटा (अांध्र प्रदेश) येथे प्रक्षेपणास उपस्थित हाेती, तर कंट्रोल रूमची जबाबदारी सांभाळणारे विद्यार्थी, त्यांचे मदतनीस, शिक्षक, प्राचार्य, संचालक आणि काही जिज्ञासू नागरिकांसाठी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात माेठ्या पडद्यावर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातील हालचाली व प्रक्षेपणाचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवले जात हाेते. त्यासोबतची कॉमेंट्री उपस्थितांच्या माहितीत भर घालणारी होती.

देशी-विदेशी एकूण २० उपग्रहांचे १२२८ किलो वजन घेऊन ठीक ९ वाजून २६ मिनिटांनी पीएसएलव्ही - सी ३४ या प्रक्षेपकाने पृथ्वी सोडली आणि ऊर्ध्व दिशेने ते झेपावले. प्रक्षेपणानंतर ८ मिनिटांत पीएसएलव्हीने ५०५ किमी उंची गाठली आणि स्पेस सेंटरप्रमाणेच कॉलेजच्या सभागृहातही टाळ्यांचा कडकडाट झाला. विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठ्या मारत, टाळ्या देत आनंद साजरा केला. ‘आव्वाज कुणाचा? सीओईपीचा..’ अशा घाेषणा देत विद्यार्थ्यांनी काॅलेजचा परिसर दणाणून साेडला.

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी : इस्रोतर्फे आज एकाच प्रक्षेपकाद्वारे तब्बल २० उपग्रह अंतराळात सोडले गेले. इस्रोची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. यापूर्वी २००८ मध्ये इस्रोने एकाच वेळी १० उपग्रह प्रक्षेपित केले होते. जागतिक विक्रम रशियाच्या नावावर (३३ उपग्रह) आहे. त्यापाठोपाठ अमेरिका (२९ उपग्रह) आहे. भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे.

अानंदाला उधाण
स्वयम् या सीओईपीच्या लघु उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण होताच माध्यम प्रतिनिधींची विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी गर्दी झाली. स्वयम टीमचे कोअर मेंबर्स सध्या श्रीहरिकोटा येथे आहेत. त्यामध्ये कॉलेजचे संचालक डॉ. आहुजा, डॉ. खळदकर व धवल, सौरभ बर्वे आणि अब्दुल्ला हुसेन यांचा समावेश आहे; पण कॉलेजमधील कंट्रोल रूम सांभाळण्याची जबाबदारी असणारे विद्यार्थी विलक्षण आनंदी झाले होते.

कंट्रोल रूममध्ये पहिला सिग्नल..
स्वयम लघु उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचा विलक्षण आनंद आहेच. प्रक्षेपणाच्या आधीची दहा मिनिटे तर मी माझ्या खुर्चीतही धड बसू शकत नव्हतो इतकी उत्सुकता, दडपण, ताण आणि जिज्ञासा अनावर झाली होती. मात्र, मी थरारून गेलो तो क्षण स्वयमकडून आलेल्या पहिल्या सिग्नलचा होता. आमचे सर्वांचे प्रयत्न त्या क्षणी यशस्वी झाल्याची भावना मनात आली. आता पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. पहिला बिकॉन सिग्नल (ऑल वेल) मिळाला आहे. आता स्वयमची सोलर यंत्रणा, अँटेना, चुंबकीय प्रणाली नियोजित पद्धतीने काम करतात का, याची परीक्षा आहे. यासाठी पहिले १५ दिवस लागतील. त्यानंतर स्वयम‌ मेसेजिंग, डाटा कलेक्शन, टेम्परेचर रेंजेसची माहिती पाठवेल. नियंत्रण कक्षात आम्ही ते सिग्नल डिकोड करू आणि डाटाचे विश्लेषण करू. - विशाल देसाई, नियंत्रण कक्षप्रमुख, सीओईपी, पुणे.

काैतुकास्पद कामगिरी
स्वयमचे हे यश ऐतिहासिक आहे. विद्यार्थ्यांनी उपग्रह बनवला, हे विशेष कौतुकास्पद आहे. या उपग्रहामुळे शास्त्रीय ज्ञानात भर पडेल. इस्रोने शैक्षणिक संस्थांसह प्रकल्प हाती घेण्याचा हा उपक्रम केला, हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आगामी काळात शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी अशा उपक्रमांना मोठा प्रतिसाद देतील. संस्थांचा, विद्यार्थ्यांचा अशा प्रकल्पांवरील विश्वास वाढेल आणि संशोधन क्षेत्रात त्या जोमाने उतरतील. - सुरेश नाईक, माजी संचालक, इस्रो.

विद्यार्थ्यांनी अंतराळात काेरले नाव - आज कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले नाव जणू अंतराळात कोरले आहे, अशी माझी भावना आहे. यातून शिक्षण क्षेत्रात ज्ञानसंबंधित सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल आणि योग्य दिशेने पुढची वाटचाल होण्यास सकारात्मक वातावरणनिर्मिती होईल. - अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण, मुंबई.
बातम्या आणखी आहेत...