आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याचा ‘स्वयम’ झेपावला, सीओपीसी विद्यार्थ्यांकडून नव्या लघुग्रहाची तयारी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील शासकीय इंजिनिअरिंगमधील (सीअाेपीसी) विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन बनवलेल्या ‘स्वयम’ या लघुग्रहाचे बुधवारी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून पीएसएलव्हीसी -३४ हा प्रक्षेपकासह यशस्वी प्रक्षेपण झाले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या इतिहासात फक्त विद्यार्थ्यांनी बनवलेला हा पहिलाच लघुग्रह अाहे, अशी माहिती ‘सीओईपी’चे संचालक भारतकुमार आहुजा यांनी दिली.

‘स्वयम’चे प्रक्षेपण अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांचा या लघुग्रहाच्या निर्मितीत, प्रणालीत, संप्रेषणात सहभाग आहे. गेल्या आठ वर्षांतील किमान चार पिढ्यांतील १७६ विद्यार्थ्यांचे योगदान ‘स्वयम’च्या प्रकल्पात आहे. ‘स्वयम’ एक वर्ष कार्यान्वित राहील. लघुग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर ४५ मिनिटांनी अँटिना निर्धारित स्थानी येईल. त्यानंतर लघुग्रह आणि सीओईपीमध्ये उभारण्यात आलेला नियंत्रण कक्ष यांचा संपर्क थेट होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागेल. संपर्क झाल्यानंतर त्याचे कार्य सुरू होईल. सहा सोलर पॅनेलवरच लघुग्रहाची सर्व यंत्रणा काम करेल. त्यासाठी खर्चही कमी येईल व इंधन बचतही होईल, अशी माहिती प्रकल्प समन्वयक आणि सीओईपीच्या अॅप्लाइड सायन्स विभागाच्या प्रा. मनीषा खळदकर यांनी दिली.

नव्या लघुग्रहाची तयारी सुरू : ‘स्वयम’च्या यशस्वी निर्मितीनंतर सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी लगेच दुसऱ्या लघुग्रहाच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे. पृथ्वीच्या वातावरणातील घटकांचा अभ्यास करण्यासाठी पतंगाप्रमाणे असणारा दुसरा लघुग्रह तयार करण्याचा प्रस्ताव दिला असून इस्रोने त्याला मान्यताही दिली आहे. आगामी चार वर्षांत हा दुसरा प्रकल्पही पूर्ण करण्यात येणार आहे.

दुसरा लघुग्रह ‘स्वयम’पेक्षा थोडा मोठा असेल. त्याला पतंगाप्रमाणे सोलर सेल जोडलेल्या असतील. अवकाशात सुमारे एक हजार किमी उंचीवर तो प्रक्षेपित केला जाईल. हवेच्या आवरणाच्या वेगवेगळ्या स्तरांचा अभ्यास त्याद्वारे केला जाईल.
बातम्या आणखी आहेत...