आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी: शहीद कर्नल संतोष होता उत्तम बॉक्सर, गोलकिपर अन् सुसाट धावपटू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद कर्नल संतोष महाडिक... - Divya Marathi
शहीद कर्नल संतोष महाडिक...
सातारा- साता-याजवळील पोगरवाडीचा सुपुत्र संतोष महाडिक मंगळवारी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मनीगामच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. आज सकाळी श्रीनगरमध्ये त्यांना लष्कराने वंदना दिली. संतोष यांचे पार्थिव सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्यात दाखल झाले. त्यानंतर ते साता-यातील पोगरवाडीकडे हलविण्यात आले. उद्या सकाळी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संतोषला सीमेवर लढताना वीरमरण आल्याची बातमी कानावर पडताच पोगरवाडीवासियांना धक्का बसला. त्यांच्या वर्गमित्रांचाही शोक अनावर झाला. संतोषचे शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये झाले. तेथील त्यांचे वर्गमित्र प्रशांत पाटील, विलास तोकडले, लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांनी आपल्या खास मित्राच्या आठवणी सांगत भावनांना वाट मोकळी करून दिली. ती अशी:
शाळेत असल्यापासूनच संतोष अतिशय धाडसी होता. तो नेहमीच सुप्रीम सॅक्रीफाईसची भाषा करायचा. गवळ्याचा मुलगा पण दूध विकण्याचा धंद्यात न पडता तो मैदानात वावरायचा. पुढे तो सैनिकी शाळेत दाखल झाला. काहीसा शांत पण गंभीर संतोषच्या मनात कायम अनेक वादळे घोंगावत असत. मैदानाची आवड असल्याने तो शाळेचा उत्कृष्ट बॉक्सर ठरला. पुढे राज्य पातळीवरील स्पर्धा जिंकणा-या फुटबॉल टीमचा तो गोलकिपर होता. याचदरम्यान त्याने उत्तम धावपटू म्हणूनही नाव कमावले. जीममध्ये तास न तास घालवायचा. जोर बैठका काढतानाही त्याच्या चेह-यावर तेज असायचे. तो जो काही करायचा तो मनापासून करायचा. याच गुणवैशिष्ट्यामुळे तो लष्करात सामील होत कर्नलपदापर्यंत पोहचला.
एकदा संतोषचा बॉक्सिंगचा सामना होता. हा सामना तो हरणार म्हणून पैज लावली. या सामन्याला दूध विकणा-या त्याच्या वडिलांनी हजेरी लावली होती. लढवय्या संतोष थोडाच हरणार होता. त्याने सामना जिंकला. त्यानंतर आम्ही काही मित्र त्याच्या घरी त्याचे अभिनंदन करायला गेलो. त्यावेळी त्याचे वडिल म्हणाले, हा सामना माझ्या मुलाने जिंकला असला तरी त्याची खरी लढाई ही नाही. त्याची लढाई होईल ती देशाच्या सीमेवर आणि देशासाठी लढताना माझा मुलगा नेहमीच जिंकलेला असेल...
आम्ही शालेय विद्यार्थी, सीमेवरची लढायांची कल्पना तितकी नव्हती, पण वडील सीमेवरच्या लढाईची भाषा करताना संतूच्या चेह-यावर स्मित हास्य झळकले होते. जणू त्याच्या मनाचीच गोष्ट वडिलांनी बोलून दाखवली. किती ही जुनी गोष्ट, पण मंगळवारी संतूच्या हौतात्म्याची बातमी कानी पडली आणि हे सारे आठवले. संतूच्या आठवणींनी आणि अभिमानाने आम्हा सर्वांचेच मन भरून आले आहे. संतू नेहमीच जिंकला आणि कुपवाडा सीमेवर शत्रूशी झुंजता-झुंजता त्याने देह ठेवला. देशासाठी शहीद होण्याचे स्वप्न पाहणा-या संतूने या महान राष्ट्राच्या संरक्षणासाठीच अखेर देह ठेवला.
बातम्या आणखी आहेत...