आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आरक्षणासाठी भांडण्याऐवजी रोजगारासाठी एकत्र लढा द्या!’शरद यादव यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे -‘शूद्रातिशूद्रांना एकत्र आणण्यासाठी मंडल आयोग आणला. ‘मंडल’मुळे जात तुटेल असे वाटले होते. पण यातून नवाच उपद्रव सुरू झाला. प्रत्येक जात पक्ष काढू लागली आहे. सर्वजण आरक्षणासाठी भांडत आहेत. मात्र आरक्षणासाठी भांडण्याऐवजी रोजगार उपलब्ध होण्याच्या लढाईसाठी पुरुषार्थ दाखवावा,’ असे आवाहन संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष खासदार शरद यादव यांनी साेमवारी पुण्यात केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या १२६ व्या पुण्यतिथीनिमित्त यादव यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि फुले पगडी या स्वरूपाचा पुरस्कार यादव यांना प्रदान करण्यात आला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, आमदार पंकज भुजबळ, समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे आदी या वेळी उपस्थित होते.

‘बडा मिल गया तो चाटो, छोटा मिल गया तो काटो,’ हा समाजाचा सिद्धांत आहे. आरक्षणाची लढाई म्हणजे दुसरे काय? सामाजिक पातळ्यांवर मागास असलेल्या शोषितांच्या, गरिबांच्या हाती असलेला आरक्षणाचा एकमेव आधार हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे यादव म्हणाले. ‘महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महान मराठी नेत्यांनी देशाला समाजउभारणीची दिशा दाखवली. जातमुक्त समाजाचे स्वप्न त्यांनी पाहिले. परंतु आज नेमकी उलटी स्थिती आहे. प्रत्येक जातीचा माणूस त्याच्या जातीच्या लोखंडी बेड्या सोन्याच्या करा म्हणून आग्रह धरतो. जाती मोडून ‘माणूस’ बनण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जात तोडल्याशिवाय फुले-आंबेडकरांचे स्वप्न सत्यात उतरणार नाही,’ असे यादव म्हणाले.

दरम्यान, समता पुरस्कार प्रदान सोहळ्याला न चुकता उपस्थित राहणारे माजी मंत्री छगन भुजबळ सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात असल्याने सोमवारी कार्यक्रमास अनुपस्थित होते. याबद्दल कुदळे, माजी आमदार दीप्ती चौधरी आदींनी खंत व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...