आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - होळीचा सण साजरा करण्यासाठी रासायनिक घटकयुक्त रंग टाळून नैसर्गिक रंग (तेही कोरड्या स्वरूपाचे) वापरण्याचा संदेश देणारा अनोखा उपक्रम ‘द सेंटर फॉर एन्व्हॉयर्नमेंट एज्युकेशन’तर्फे राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील पन्नास शाळांमधील विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. निर्माल्यापासून फुलांचे नैसर्गिक रंगही या उपक्रमांतर्गत बनवण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांसाठी इको एक्झिस्ट, निरामय महिला बचत गट, सोसायटी फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट, दिल्ली या सर्वांचे सहकार्य मिळाले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पाठिंबा
यमुना नदी निर्माल्यमुक्त करण्यासाठी कार्यरत असणा-या दिल्लीच्या संस्थेने विविध मंदिरे व नागरिकांकडून गोळा केलेले निर्माल्य वापरून गुलाबी व लाल रंग तयार करण्यात आले आहेत. या रंगांचे पॅकेजिंग पुण्यात करण्यात आले आहे. या रंगांच्या वापराला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पाठिंबा दिला आहे. सुरक्षित होळीच्या आनंदासाठी हे रंग वापरा, असे त्याचे कँपेनिंगही मंडळाने केले आहे. नैसर्गिक पद्धतीने रंग कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण राज्यातील पन्नास शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या सर्व शाळा ग्रामीण भागातील आहेत.
नैसर्गिक रंग तयार करण्याचे महत्त्वाचे काम निरामय महिला बचत गटाने केले असून त्यांना दिल्लीच्या द सोसायटी फॉर चाइल्ड डेव्हलपमेंटचे आर्थिक सहकार्य मिळाले आहे. सर्व रंग हर्बल स्वरूपाचे असून त्यांच्या सर्व प्रयोगशाळांमधील चाचण्या यशस्वी करण्यात आल्या आहेत. हे रंग मुलांनी होळी व रंगपंचमी खेळण्यासाठी वापरण्यास योग्य आहेत, असे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे.
सामाजिक भान जपण्यासाठी
कुठल्याही सणाचा आनंद समाजातील सर्व विशेषत: उपेक्षित घटकांबरोबर वाटून घेण्याती जाणीव उपरोक्त संस्थांनी जपली आहे. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी विशेष मुले, निराधार महिला, अपंग, अंध, मूकबधिर व बहुविकलांग मुलेदेखील या रंगोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यासाठी रंगदुलार नावाने होळीचा सण माहेर, बालकल्याण संस्था, अंधशाळा, विद्याज्योती शाळा, डोअरस्टेप स्कूल, नवक्षितिज स्कूल, दिलासा संस्था येथील मुलांसह साजरा केला जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.