आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Complaint Against Pune Collector News In Divya Marathi

पुणे जिल्हाधिकार्‍यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नागपूर व पुणे या दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असल्याची जाहीर कबुली देणारे पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीची याचिका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांच्या न्यायालयात बुधवारी दाखल झाली.

पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विनायक अभ्यंकर यांनी ही याचिका दाखल केली. सांगली जिल्ह्यातील सुमारे एक लाख मतदारांची नावे पुण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यावर ‘माझेही नाव नागपूर व पुणे येथील मतदार यादीत आहे,’ असे वक्तव्य राव यांनी एका पत्रकार परिषदेत केले होते.

दरम्यान, अ‍ॅड. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. एका व्यक्तीचे दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असल्यास व त्याने दुसर्‍या ठिकाणी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी अर्ज केल्यास पहिल्या यादीतील नावाबाबत शपथेवर माहिती देणे व ते रद्द करून घेण्याची मागणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. कोणत्याही व्यक्तीचे दोन ठिकाणी नाव असल्यास त्याला दंड किंवा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. राव हे जिल्हा निवडणूक अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी दोन ठिकाणी मतदार यादीत नाव ठेवून गुन्हा केला आहे. त्यामुळे राव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.