आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Complusory Marath Langauge Role Like Terrorist Dr.Sandanand More

मराठी भाषेच्या सक्तीची भूमिका अतिरेकी, डॉ. सदानंद मोरे यांचे मनोगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संत नामदेवांची कर्मभूमी घुमानला होणा-या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची बुधवारी निवड झाली. मोरे यांना ४९७ तर ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांना ४२७ मते मिळाली. डॉ. अशोक कामत यांना ६५ तर पुरुषोत्तम नागपुरे यांना दोन मते मिळाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्याने साहित्य महामंडळाचे निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी मोरे यांना विजयी घोषित केले. संताच्या कर्मभूमीत संतसाहित्याच्या अभ्यासकाला अध्यक्षपद मिळाले आहे. त्यानिमित्त डॉ. मोरे यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत...

मराठी भाषेची, मराठी शाळांची सक्ती करावी, ही अत्यंत टोकाची भूमिका झाली. कुठल्याही बाबतीत अतिरेकी टोकाची भूमिका घेऊ नये, असे माझे मत आहे. आजच्या काळात तर उपरोक्त कुठलीही भूमिका सर्वस्वी स्वीकारणे अशक्य आहे, त्यामुळे समन्वयाची बाजू मांडणे महत्त्वाचे आहे. घुमानचे साहित्य संमेलन ही समन्वयवादी भूमिका मांडण्याचे सर्वमान्य व व्यापक व्यासपीठ आहे.

संमेलनाध्यक्षपदी माझी झालेली निवड मी डॉ. श्रीपाल सबनीस आणि भा. पं. बहिरट यांना अर्पण करतो. डॉ. सबनीस यांनी माझी उमेदवारी जाहीर होताच स्वत: उभे राहण्याचा विचार सोडून मला पाठिंबा जाहीर केला. डॉ. बहिरट यांना १९९६ मध्ये आळंदी येथील संमेलनाच्या वेळी आपला अर्ज मागे घ्यावा लागला होता. आळंदी येथील संमेलनात संत ज्ञानदेवांच्या अभ्यासकाला अध्यक्षपद मिळावे, अशी आमची भूमिका होती. पण तसे घडले नाही. त्यामुळे यंदा संत नामदेवांच्या भूमीत होणा-या संमेलनाला संतसाहित्याचा अभ्यासक असणा-या मला अध्यक्षपद मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर मला बहिरट यांचे स्मरण होत आहे. या दोन स्नेह्यांना मी माझे अध्यक्षपद अर्पण करत आहे.

संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया वादरिहत, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, याचे श्रेय अन्य तीनही उमेदवारांचे आहे. आज (१० डिसेंबर) कवी दिलीप चित्रे यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनाही मी अभिवादन करतो. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही खूप मोठी जबाबदारी आहे. अपेक्षाही वाढल्या आहेत. संतपरंपरेचा, विचारांचा आधुनिक जगण्याशी, वर्तमानाशी असणारा अन्वयार्थ मांडणे, हीच माझी भूमिका आहे. घुमानच्या व्यासपीठावरून मी तीच मांडण्याचा प्रयत्न करेन.

परंपरेच्या संचितात वर्तमानाचा अन्वयार्थ
आपल्या परंपरेशी असलेली नाळ अतूटच आहे, असावी. ती आपली ओळख आहे. पण म्हणून वर्तमानाचे, सद्यस्थितीचे, भवतालचे भान विसरावे, असे नाही. उलट परंपरेचे संचित जागे ठेवूनच भवतालाचा, वर्तमानाचा अन्वयार्थ शोधला पाहिजे. तेवढी संवेदनशीलता जपली पाहिजे.

सवडीशिवाय साहित्यनिर्मिती कशी करणार?
साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, हे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे विधान व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. साहित्यनिर्मितीसाठी रिकामटेकडेपणा लागतोच, त्याशिवाय संशोधन-लेखन कसे करणार ?