आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conducts Narko Test Of Manish Nagori, Pune Police Decision In The Dabholkar Case

दाभोलकर हत्या: मनीष नागोरीची नार्को टेस्ट करण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित मनीष रामविलास नागोरी व विकास रामअवतार खंडेलवाल या दोघांची नार्को चाचणी करून सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न पोलिस करत असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. दरम्यान, ‘या खुनाच्या कबुलीसाठी एटीएसने आपल्याला 25 लाखांची ऑफर दिली आहे,’ असा गौप्यस्फोट नागोरीने मंगळवारी न्यायालयात करून खळबळ उडवून दिली होती.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पोलिसांना सहा प्रत्यक्ष साक्षीदार मिळाले आहेत. नागोरीसह दोन्ही संशयित आरोपींची त्यांच्यासमोर ओळखपरेड घेण्यासाठीही पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दाभोलकरांच्या हत्येनंतर पोलिसांनी दोन संशयितांची रेखाचित्रे काढली होती. त्यापैकी एकाचे चित्र खंडेलवाल याच्याशी जुळत असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रत्यक्षदश्री साक्षीदारांनी त्यास पुष्टी दिल्यास पोलिसांना आणखी भक्कम पुरावे मिळण्याची आशा आहे.
नागोरी याने खंडेलवाल याला विक्री केलेले 7.65 एमएमचे पिस्टल हे मुंब्रा पोलिसांनी जप्त केले आहे. सदर पिस्टल व दाभोलकर यांची हत्या झालेले पिस्टल एकच असल्याचे बॅलेस्टिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याच पिस्टलमधून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या असाव्यात, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, मुंब्रा पोलिसांकडून अद्याप हे पिस्टल पुणे पोलिसांनी हस्तगत केलेले नाही. नागोरी याने हे पिस्टल मध्य प्रदेशातून आणल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.
खरा सूत्रधार कोण?
पुण्यातील गुन्हे शाखेचे पथक ‘एटीएस’च्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत असून, पुण्याबाहेर अजून तरी कोणतीही टीम तपासकामासाठी रवाना करण्यात आलेली नाही. नागोरी व खंडेलवाल यांचा सदर घटनेमागचा सूत्रधार कोण, पिस्टलची विक्री कोणाकोणास केली आहे, खुनाचा उद्देश काय, त्यांचे इतर साथीदार कोण? याची पोलिस चौकशी करत आहेत.