आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conflicts Between Two Ncp Leader At Satara, Ramraje & Udayanraje Clashes

सातारा: राष्ट्रवादीत गृहकलह, रामराजे- उदयनराजेत संघर्ष उफाळला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सातारा जिल्ह्यातील दोन राजे घराण्यांच्या नेत्यांत संघर्ष उफाळून आला आहे. साता-याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर या दोन राष्ट्रवादीतील नेत्यांत आरोप-प्रत्यारोप व शह-कटशहाचे राजकारण सुरुच आहे. खासदार उदयनराजे यांनी रामराजे यांच्या फलटणमध्ये जाऊन पक्षाध्यक्ष शरद पवारांसह अजित पवार व रामराजे यांना घरचा आहेर दिल्यानंतर रामराजेंनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले. त्यावर उदयनराजेंचे पित्त खवळले असून, मी गटार बांधली नाहीत पण भ्रष्टाचार करणा-यांची थडगे बांधतो अशा शब्दात रामराजेंचा समाचार घेतला आहे.
तीन-चार दिवसापूर्वी खासदार उदयनराजे यांनी फलटणमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत हजेरी लावत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला होता. निरा धरणाच्या उजव्या कालव्यासाठी गेली कित्येक वर्ष लढा दिला जात आहे. मात्र तोडगा निघत नाही. निरेच्या उजव्या कालव्यातील पाणी बारामतीला पळवले जात असून हा सगळा शरद पवारांचा डाव असल्याची टीका उदयनराजेंनी केली होती. आता त्यासाठीच साताऱ्यातले सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत असा इशारा त्यांनी पक्षाला दिला.
त्यावर रामराजेंनी उदयनराजेंवर घाणाघाती टीका केली. रामराजे म्हणाले होते की, ऐतिहासिक नातेसंबंधामुळे आपण गप्प होतो. मात्र कोणी, काहीही बोलणार असेल तर आपण गप्प बसणार नाही. त्यावर ज्यांनी कधी गटार बांधले नाही त्यांनी मला शिकवू नये. पाणी प्रश्नांवर माझ्याइतका अभ्यास कोणाचाही नाही. पाणी प्रश्‍नावर बोलण्याचा त्यांना अधिकारच काय? दारूच्या ग्लासात ओतल्या जाणार्‍या पाण्यापुरताच त्यांचा पाण्याशी संबंध येतो. ज्यांनी पक्ष निष्ठेला प्राधान्य दिले, पक्ष नेतृत्वाला मनापासून साथ दिली त्यांचीच दखल पक्ष नेतृत्व घेते. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा आहे. सातारच्या छत्रपतींनी त्याला धरून छत्रपतींसारखे वागावे. त्यानंतरच विधानपरिषदेचा सभापती, सभापतीसारखा वागेल. ज्या व्यक्तीला राष्ट्रवादीने दोन वेळा खासदार केले. तीच व्यक्ती गेली 5 वर्षे काँग्रेसला मदत करीत होती आणि आता भाजप-शिवसेनेला मदत करू पहात आहेत. पालकमंत्र्यांच्या सहकार्याने जिल्हा बँकेत पॅनेल टाकायचा प्रयत्न करत आहेत. ही कसली पक्षनिष्ठा? पालकमंत्र्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करावेच. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी देशात ‘काँग्रेसमुक्ती’चा नारा दिला, त्याप्रमाणे आपणही सातारा जिल्हा उदयनराजेमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा शब्दात रामराजेंनी उदयनराजेंवर घाणाघात केला होता.
दरम्यान, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी जहरी टीका केल्यानंतर मंगळवारी उदयनराजे समर्थकांनी रामराजेंचा पुतळा जाळत साता-यात राडा केला. पोलिस यत्रंणा उपस्थित असतानाही हा राडा सुरु होता हे विशेष. त्यानंतर आज खासदार उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन रामराजेंसह अजित पवारांवर टीका केली. कृष्णा खोरे व जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराचा उल्लेख करून मी भ्रष्टाचार करणा-यांची थडगे बांधणार असल्याचे उद्यनराजेंनी सांगितले. विधान परिषदेच्या सभापतीची निवड पक्षाकडून चुकली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्याला माहित असेल की जलसंपदा मंत्रीपद अजित पवारांनी उपभोगले आहे व त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तर रामराजे निंबाळकर यांनी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापन केली होती. तसेच त्यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. कृष्णा खोरे खात्यातही मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले गेले आहेत.