आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसही अटीतटीवर;144 जागांवर अडलेल्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांची तंबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/मुंबई- जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतील धुसफूस गुरुवारी पुन्हा चव्हाट्यावर आली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत विश्वासघात करणार्‍या राष्ट्रवादीशी आघाडी न करता आगामी विधानसभा लढवावी, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुण्यात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात धरला.

या वेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांच्या भावनेची दखल घेत कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाशी तडजोड केली जाणार नाही, अशी हमी दिली. वर ‘सन्मानाने निर्णय झाला तरच आघाडी होईल, अन्यथा 288 मतदारसंघांत कामाला लागा’, असे फर्मानही त्यांनी कार्यकर्त्यांना सोडले.

दुसरीकडे, मुंबईत समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते पुन्हा 144 जागांसाठी अडून बसले. यावर तोडग्यासाठी शरद पवार दोन दिवस नेत्यांशी चर्चा करतील. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

यावेळी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांच्या कॉंग्रेस अध्यक्षांनी राष्ट्रवादीवर दगाबाजीचा आरोप करून आघाडी तोडण्याची मागणी केली. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे बळ काँग्रेसमुळेच वाढल्याचा दावा
भीती कशाची?
2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बंडखोरांमुळे काँग्रेसने प. महाराष्ट्रात अनेक जागा गमावल्या होत्या. या वेळीसुद्धा तसे घडण्याची भीती काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. स्वबळावर लढल्यास जास्त जागा जिंकू, असा विश्वास त्यांना वाटतो.

पहिली उमेदवार यादी 7 ऑगस्टला
काँग्रेसची पहिली यादी 7 ऑगस्टपूर्वी व नंतर दोन दिवसांत उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध होईल. राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केली असली तरी त्यांची मागणी कदापि मान्य केली जाणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादी 144 जागांवर अडली
मुंबई- राष्ट्रवादीने बुधवारी रात्री पुन्हा 144 जागांच्या मागणीचा सूर समन्वय समितीच्या बैठकीत लावला. एकही जागा कमी घेणार नाही, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली. शनिवारी शरद पवार ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेऊन यासंदर्भातील अंतिम भूमिका जाहीर करतील.