आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Azam Pansare, Bhoir Joins In Ncp

उद्योगनगरीत राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; पवारांच्या उपस्थितीत पानसरे, भोईरांचा प्रवेश होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत पक्षाची ताकद आणखी मजबूत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाच महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षात गेलेले माजी शहराध्यक्ष आझम पानसरे येत्या 4 तारखेला स्वगृही परतणार आहेत. पानसरे यांच्याबरोबरच काँग्रेसमधून नुकतेच बाहेर पडलेले पक्षाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, बाबासाहेब तापकीर यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. येत्या 4 ऑक्टोबरला बालेवाडी येथे होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात व शरद पवारांच्या उपस्थितीत ते पक्षात पुन्हा सन्मानाने प्रवेश करणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शहरात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात आझम पानसरे यांनी हजेरी लावल्याने त्यास दुजोरा मिळाला आहे.
काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे यांच्यासह माजी नगरसेवक सतीश दरेकर, गोपाळ कुटे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. येत्या 4 ऑक्टोबरला बालेवाडी येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राज्याच्या ग्राहक कल्याण व सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष आझम पानसरे यांच्यासह वाघेरे, दरेकर आणि कुटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे. लक्ष्मण जगताप यांनी भाजपात प्रवेश करताच शरद पवारांसह अजित पवारांनी आझम पानसरेंना पक्षात परत येण्याची विनंती केली. मला तुमच्या नेतृत्त्वाबाबत कधीच आक्षेप नव्हता. मी तुमचाच कार्यकर्ता आहे. तुम्ही जे सांगाल तेच करीत आलो आहे व पुढेही करीत राहीन असे पानसरेंनी शरद पवारांना साद घातली. शरद पवार व पानसरे यांचे मागील 40 वर्षापासून संबंध आहेत.
लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळू लागल्याने आझम पानसरे यांनी राज्याच्या ग्राहक कल्याण व सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. पक्षात गद्दारांना सन्मानाची वागणूक मिळते. प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी दिला जातो, असा आरोप करीत राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचे मन तेथे रमले नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. त्यातच त्यांचे कट्टर विरोधक आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आझम पानसरे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळवून देण्याचा चंग पानसरे यांनी बांधला असल्याचे कळते.