आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाकलल्याशिवाय सत्ता सोडणार नाही शिवसेना, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी साेमवारी पुण्यात व्यक्त केले. मुंबई महापालिकेतील महापौरपदावरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षाबद्दल ते बोलत होते. मुंबई महापालिकेतील संभाव्य आघाडीबद्दल मी शिवसेनेशी किंवा शिवसेनेतून माझ्याशी संपर्क साधला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  
 
मुंबईत भाजप- शिवसेना एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही, असे संकेतही राणे यांनी पत्रकारांशी बाेलताना दिले.  ‘मुंबईत कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी शक्य आहे का?’, या प्रश्नावर राणे म्हणाले, ‘काँग्रेसचे निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असल्याने यासंदर्भात मी बोलणार नाही,’ असे सांगतानाच फडणवीस सरकारवर अविश्वास ठराव आणण्याची शक्यताही राणे यांनी फेटाळून लावली.
 
‘पुरेसे संख्याबळ नसल्याने हा विचार करता येणार नाही. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असेल तर मग अविश्वास ठराव आणण्याचीही गरजही पडणार नाही. पण त्यासाठी आधी शिवसेनेने निर्णय घेतला पाहिजे. परंतु, शिवसेना सत्ता सोडण्याची शक्यता नाही,’ असेही ते म्हणाले.   
 
नववी पास काँग्रेस उमेदवार  
‘निवडणुकीसाठी मुलाखती घेत होतो. शहराचे नाव मी सांगणार नाही. नववी इयत्तेपुढचा एकही उमेदवार नव्हता कॉंग्रेसमध्ये. महापालिकेचे बजेट शेकडो कोटींचे असते. शिकलेल्या माणसाला ते कळेल? नववी नापासाला काय कळणार,’ अशी कोपरखळी राणे यांनी मारली.  
 
‘विकाऊ’ प्राध्यापक  
‘सिंधुदुर्गात प्राध्यापकांची कॉलनी आहे. काही कार्यकर्ते सांगत आले, की ते लोक पैसे मागतात. मी म्हणालो, ‘अरे असे करू नका. प्राध्यापक मंडळी आहेत. पैसे द्यायला गेल्यावर ते रागावतील’. मात्र त्यांनी घरामागे पाच-दहा हजार सांगितले. प्राध्यापक- शिक्षकांचे हे विचार. हे परिवर्तन शिक्षणामुळे की कशामुळे?’ असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. शिक्षणाबरोबर संस्कार असते तर निवडणुकीचा निकाल कालच्यासारखा लागला नसता. मत अमूल्य म्हणतात. पण मताला अाता ‘किंमत’ आल्याचे ते म्हणाले.

पराभव मान्य करा  
‘कोण म्हणतो ‘ईव्हीएम’मुळे, कोण म्हणतो पैशांमुळे सत्ता गेली. पण एकदा पराभव झाल्यानंतर कारणे सांगणे योग्य वाटत नाही. आधीच काळजी घ्यायला हवी होती. आता बोलून काय उपयोग? भाजपचा विजय झाल्यानंतर तक्रारी करण्यात अर्थ नाही. भाजपने हा विजय प्रामाणिकपणे मिळवलेला नाही, यात मात्र तथ्य आहे,’ असे नारायण राणे म्हणाले.  
 

पुढील स्लाइडवर वाचा... फडणवीस सरकार अडचणीत आणण्याची विरोधकांची खेळी, असे असतील राजकीय डावपेच

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...