पुणे - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीवर आधारित मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ या चित्रपटविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच अपेक्षेपेक्षा अधिक प्रसिद्धी मिळत आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी शनिवारी दुपारी एनआयबीएम रस्त्यावरील बिटोज बार अँड किचन येथे पत्रकार परिषद ठेवली होती. पण काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करू शकतात, हे लक्षात आल्यानंतर पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. भांडारकर त्यानंतर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले, तेव्हा तिथेही काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याआधीच पोचल्याने भांडारकरांनी तोही कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर रेल्वे स्थानकाजवळच्या क्राऊन प्लाझा हॉटेलमध्ये दुपारी तीन वाजता नव्याने पत्रकार परिषदेचे निरोप पोचले. पण तीही परिषद होण्यापूर्वीच काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे हे कार्यकर्त्यांसह तिथे पोचले. त्यामुळे येथील पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली.
भांडरकरांना भाजपचा पाठिंबा : काँग्रेस
‘हे वर्ष इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. देशात हे वर्ष उत्साहाने साजरे करण्याचे उपक्रम काँग्रेस पक्षाने हाती घेतले आहेत. पण त्याला विरोध करण्याचा नवा मार्ग भाजप सरकारने या चित्रपटाच्या निमित्ताने शोधला आहे. भांडारकरांना या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भाजपच पाठिंबा देत आहे. चित्रपटात आणीबाणीचा निर्णय व कालखंडावर भाष्य करण्यात आले आहे. हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. पक्षाचे कार्यकर्ते हॉटेल आणि विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बसले आहेत. आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणि प्रमोशनला विरोध करणार,’ अशी भूमिका काँग्रेसने घेतली.