आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consumer Movment Pioneer Bindumadhav Joshi No More

ग्राहक चळवळीचे अध्वर्यू बिंदुमाधव जोशी कालवश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिंदुमाधव जोशी (८६) यांचे रविवारी येथील खासगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते हृदय आणि फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती खालावल्यामुळे जोशी यांना मागील आठवड्यात उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी सव्वातीनला त्यांची प्राणज्योत मालवली.

अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सायंकाळी सहा ते आठदरम्यान कसबा पेठेतील ‘पसायदान' या बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नवी पेठेतील ‘वैकुंठ’ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील, असे ग्राहक पेठेचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.
कायदा व प्राधिकरणही जोशींमुळेच : बिंदुमाधव जोशी यांच्या अथक प्रयत्नांमुळेच १९८६ मध्ये ग्राहक पंचायत कायदा संमत करण्यात आला. तसेच स्वतंत्र ग्राहक प्राधिकरण व ग्राहक कल्याणकारी विभागाचीही स्थापना होऊ शकली. त्यांचे हे कार्य सर्वत्र प्रशंसनीय ठरले.

अल्पपरिचय
बिं दुमाधव जोशी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३१ रोजी झाला. पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून झाले. गोवा मुक्तिसंग्रामात जोशी यांनी उडी घेतली आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज सत्तेविरोधात झालेल्या सशस्त्र उठावातही जोशी यांनी सहभाग घेतला. सामाजिक कार्याची त्यांची तळमळ त्यानंतरही कायम राहिली आणि आदिवासी तसेच तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. याच काळात ते जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कात आले. जोशी यांचे कार्य पाहून स्वत: जयप्रकाशजीदेखील प्रभावित झाले आणि तुम्ही नवनिर्माण चळवळ उभी केली आहे, असे कौतुगोद््गार त्यांनी काढले. त्यानंतरच्या काळात १९७४ मध्ये जोशी यांनी जेव्हा अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापन केली तेव्हा उद्घाटनासाठी स्वत: जयप्रकाशजी आले होते. ग्राहकांच्या हक्कासाठी सदैव जागरूक व प्रयत्नरत राहणा-या जोशी यांनी सातत्याने वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके व ग्रंथातून तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून ग्राहकांच्या हितासाठी व जागृतीसाठी लेखनकार्य केले.