आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये व्हेंटिलेटरवर, डॉक्टरच नसल्याचे रुग्णांचे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- उद्योगनगरी असा लौकिक असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेची रुग्णालये डॉक्टरच नसल्याने व्हेंटिलेटरवर आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण व तालेरा रुग्णालयात रुग्णांचा उपचार ‘रामभरोसे’ असल्याचेही म्हटले जात आहे. ऑपरेशन थिएटर बंद, डॉक्टर नसल्याचे फलक यामुळे शहरातील गरिबांनी उपचारासाठी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालयांची ही अवस्था सुधारण्यासाठी महापालिकेने ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.
 
वायसीएममधील ऑपरेशन थिएटर बंद
शहरात यशवंतरावराव चव्हाण रुग्णालय, तालेरा रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, भोसरी, थेरगांव, सांगवी, आकुर्डी आणि यमुनानगर येथे आठ मुख्य रुग्णालये आहेत. तर २६ ओपीडी शहरात कार्यरत आहेत. मात्र या सगळ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शहरातील सर्वात मोठ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर काही दिवसांपासून बंद आहे. तर दुसरीकडे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्या आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता मागील कित्येक वर्षांपासून जाणवत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. डॉक्टर व अन्य कर्मचारी भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून महापालिका प्रशासन मुळ विषयाला बगल देत आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांचे हाल नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरत आहे. या संदर्भात नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठवूनही अधिकाऱ्यांवर परिणाम होत नाही. 
 
रुग्णालयाची इमारत धोकादायक
अन्य रुग्णालयांची देखील काही परिस्थिती वेगळी नाही. चिंचवडमधील तालेरा रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे .त्याचबरोबर तालेरा रुग्णालयामध्ये तर काही दिवसांअगोदर डॉक्टर नसल्याचा फलक प्रशासनाकडून लावण्यात आला होता. मात्र, प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रसारित होताच फलक हटविण्यात आला.
 तालेरा रुग्णालयाच्या बाजूलाच नवीन सावित्रीबाई फुले रुग्णालय तयार करण्यात आले आहे. मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून देखील या इमारतीमध्ये ऑपरेशन थिएटर नाही. लेबररूम नाही, स्किन स्पेशललिस्ट नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
 
नाईलाजाने करावा लागत आहे खासगी रुग्णालयात उपचार
पावसाळा सुरु झाल्याने साथीचे आजार वाढले आहेत. डेंगू, स्वाईन फ्लूचे व अन्य गंभीर आजारांचे रुग्ण या रुग्णालयात येत आहे. मात्र नागरिकांवर खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ येत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...