पुणे- अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 24 वर्षीय युवकाने
आपल्या आईची हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पिंपरी-चिंचवड शहरातील रावेतमधील भोंडवे वस्ती येथे ही घटना घडली. माधुरी चांदणे (वय 40, भोंडवे वस्ती, रावेत) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रोहित चांदणे (वय 24) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, रोहितच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आई माधुरी चांदणेंने दुसरा
विवाह केला. मात्र, तरीही आईचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय रोहितला होता. यातून त्यांच्यात वाद होत असत. बुधवारी रात्रीही असाच त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी रोहितने आई माधुरीच्या पोटात चाकूने सपासप वार केले. यात ती जागीच मृत पावली. त्यानंतर रोहित चांदणे स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला व माझ्याकडून आईचा खून झाल्याची माहिती दिली.
आणखी एका तरूणाचा खून- पवन ज्ञानेश्वर काटे (वय 23, रा. दापोडी) या तरूणाचा अज्ञातांनी बुधवारी रात्री धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पवन याची नुकतीच दोनदा वेगवेगळ्या कारणास्तव भांडणे झाली होती. याच वादातून पवनची हत्या झाल्याचा संशय आहे. दापोडीतील फिरंगाई देवी मंदिराजवळ बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. पवन काटे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी आघाडी आकुर्डी विभागाचा अध्यक्ष होता.