आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: दागिने चोरणारी महिला जेरबंद; लक्ष विचलित करून 7 लाख लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील अनेक मंगल कार्यालयांत जाऊन वधू-वर कक्षातील किंवा पाहुण्यांचे दागिने चोरत असलेल्या एका महिलेस चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. मंगल बाबूलाल शेख ऊर्फ मंगल राजू तापकीर (वय 45, रा. खडकी) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

पाषाण परिसरातील सुस रस्त्यावरील ज्ञानदीप लॉन्स मंगल कार्यालयात गुरुवारी चोरी झाली. त्या अनुषंगाने, कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात पोलिस टेहळणी करत होते. त्या वेळी एक महिला पोलिसांना पाहताच भिंतीच्या आडोशाला लपली. महिला पोलिसांनी झडती घेतली असता तिच्याकडे मोहिनी श्याम शिंदे (39, रा. भोर) या महिलेचे 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन कर्णफुले असा ऐवज आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शर्टवर घाण पडल्याचे सांगत 7 लाख लांबवले-

बँकेत पैसे भरण्यासाठी निघालेल्या तरुणाला, 'तुझ्या शर्टवर घाण पडली आहे' असे सांगत दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्याच्याकडील सुमारे सात लाख रुपये लंपास केले. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावर बालाजीनगर येथे शुक्रवारी घडली.
अझहर जाफरानी (वय 24) याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझहर एका बँकेतून काढलेले पैसे दुसऱ्या बँकेत भरण्यासाठी चालला होता. त्याच वेळी दुचाकीवर आलेले अज्ञात दोघे त्याच्याजवळ आले. 'तुझ्या शर्टवर घाण पडली आहे,' असे त्यांनी अझहरला सांगितले. लक्ष विचलित होताच या दोघांनीही अझहरजवळील पैशाची बॅग घेऊन पोबारा केला.
लाच घेताना पोलिस अटकेत-

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकावर कोणतीही कारवाई करू नये म्हणून तीन हजार रुपयांची लाच घेताना यवत पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई संतोष दिलीप पंडित यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्याविरोधात एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने त्यास अटक केली.
बातम्या आणखी आहेत...