आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dabholkar Murder Case: Not Prob By CBI; Hamid, Mukta Dabholkar Sat In Agitation

दाभोळकर हत्याप्रकरण: सीबीआय तपास परस्पर नको,डॉ. हमीद, मुक्ता दाभोलकर यांचे पुण्यात आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी, पोलिसांना अद्याप मारेकरी अथवा सूत्रधार न सापडल्याने आमची तीव्र नाराजी आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषणकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी परस्पर घेऊ नये. त्यासंदर्भात दाभोलकर कुटुंबीय व अंनिस कार्यकर्ते यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी अंनिस कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
मुक्ता म्हणाल्या, गृहमंत्र्यांनी सीबीआयकडे तपासाबाबत केलेल्या विधानातून सरकारची हतबलता दिसून येते. राज्यातील पोलिस याचा तपास करु शकत नाही, असे स्पष्ट होते. सीबीआय तपासाला आमचा आक्षेप नाही मात्र दुस-या यंत्रणेकडे तपास देऊन शासनाने त्यांचे उत्तरदायित्व झटकू नये.
तपास अधिकारी बदलावेत : आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासाच्या हेतूबाबत शंका नाही मात्र, त्यातून कोणताही निकाल हाती न येणे हे निराशाजनक आहे. तपास चालू राहून त्यातून नवीन
माहिती पुढे आली पाहिजे. मुख्य म्हणजे गुन्हेगार सापडले पाहिजेत. त्यासाठी प्रसंगी शासनाने तपास अधिकारी बदलावेत, अशी मागणीही मुक्ता दभोलकर, डॉ. हमीद यांनी केली.
फेसबुकवरही निषेध
डॉ.दाभोलकर यांचे मारेकरी पाच महिन्यांनंतरही पोलिसांना सापडत नसल्याने त्याचा सोशल मीडियावर सोमवारी निषेध करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राष्‍ट्र सेवा दल यांचे वतीने सोमवारी फेसबुकचे पेज काळे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेकांनी आपले फेसबुक पेज सोमवारी काळे ठेवले.
तपासाची माहिती द्या
डॉ.दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर किती वेळात पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्यांना मृतदेहाची ओळख कधी पटली, पोलिस चौकीसमोर हल्लेखोरांनी दुचाकी लावली त्यावेळेस चौकीतील पोलिस कुठे होते, पोलिसांनी तपासाची माहिती पारदर्शकपणे देत सद्य:स्थिती स्पष्ट अशी मागणी डॉ.हमीद यांनी केली.
पोलिसांची खातेनिहाय चौकशी करा
डॉ.दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी कोणत्या उपाययोजना केल्या याची खातरजमा करुन आरोपी कसे निसटले याची चौकशी व्हावी. या घटनेस कोण जबाबदार आहे व तपास न लागण्यात कोण दोषी आहे याची पोलिस खात्याअंतर्गत चौकशी व्हावी, अशी मागणीही डॉ. हमीद यांनी केली. धर्मांध शक्ती अजूनही डॉ.दाभोलकरांच्या विरोधात लिखाण करत असून शासनाकडून कारवाई होत नसल्याने त्यांना मोकळे रान मिळत आहे. त्यांच्यावरही कारवाईची मागणी त्यांनी केली.