आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dabholkar Murder Case : Sushilkumar Shinde Comments Take Pune Police Into Trouble

दाभोळकर हत्या प्रकरण: सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने पुणे पोलिसांची पंचाईत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तीन महिने गुन्हे शाखेच्या
पोलिस पथकांनी राज्यभर व परराज्यात कसून तपास करूनही कोणतेही ठोस धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. मात्र, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हल्लेखोरांचा सुगावा लागल्याचे जाहीर केल्याने पोलिसांची पंचाईत झाली आहे.
सहायक पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणावरून आता पोलिसांवर दबाव वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी 34 तपास पथकांनी राज्यातील विविध कारागृहातील कैदी, सराईत गुन्हेगार, सुपारी किलर, शस्त्र विक्री करणारे टोळे, संशयित संस्था व व्यक्ती यांचे जबाब नोंदवले. गोवा, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली व मध्यप्रदेश अशा विविध राज्यात पोलिसांची पथके रवाना होवून हल्लेखोरांचा तपास केला. सुरुवातीला गोव्यात तपास केंद्रित करणा-या पोलिसांनी महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमेवरील सांगली-इचलकरंजी-कोल्हापूर या पट्टयावर लक्ष केंद्रित केले. त्याकरिता तपास पथक दोन ते तीन आठवडे या भागात हल्लेखोरांची माहिती मिळवण्यासाठी फिरत होते. दरम्यानच्या काळात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) इचलकरंजीतील शस्त्र विक्री करणारी चार जणांची टोळी मुंबईतून अटक केली. या टोळीकडे एटीएसने महिनाभर चौकशी केली.त्यांच्याकडूनही ठोस पुरावे मिळू शकलेले नाहीत.
पुणे विद्यापीठातील रखवालदार प्रल्हाद जोगदंडकर (56) याच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून पोलिसांनी मनिष ऊर्फ मन्या ऊर्फ राजूभाई रामविलास नागोरी (24), राहूल सखाराम माळी (21), विकास रामअवतार खंडेलवाल (22) व संतोष ऊर्फ सनी अनंता बागडे (22) यांना अटक करून त्यांच्याकडे डॉ.दाभोलकर प्रकरणाची चौकशी केली. संशयाच्या आधारे आता हेच खरे आरोपी असल्याचे भासवले जात असले तरी ठोस पुरावे मात्र पोलिसांकडे नाहीत. या आरोपींच्या इतर साथीदारांचा तसेच हल्ल्यातील पिस्तुलचा तपास सुरू असला तरी याबाबत माहिती देण्यास अधिका-यांनी नकार दिला आहे.
उलटसुलट विधाने
हायकोर्टात पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हत्येमागे हिंदुत्ववादी संघटना नसल्याचे म्हटले होते. दुस-याच दिवशी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी औरंगाबादेत अशा संघटनांना अद्याप क्लीन चिट दिली नसल्याचे वक्तव्य केले. तिस-या दिवशी सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईत बोलताना दाभोलकर हत्या प्रकरणात ठोस पुरावे मिळाल्याचे जाहीर केले. यामुळे तपासाबद्दल अजूनही संभ्रमच आहे.