आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dada's Temper Increases Due To Shiv Sena MLA Loksabha Election In Baramati

शिवसेना आमदार लोकसभा निवडणूक बारामतीमधून लढवणार असल्याने दादांचा पारा चढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुरंदर (जि. पुणे) येथील शिवसेना आमदार विजय शिवतारे 2014 ची लोकसभा निवडणूक बारामतीमधून लढवणार असल्याच्या नुसत्या चर्चेमुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढला आहे. बारामती मतदारसंघात रविवारी झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी शिवतारे यांच्यावर जोरदार टीका करून त्यांचा त्रागा व्यक्त केला. मात्र, टीका करण्याच्या नादात चक्क पुरंदरच्या आमदारांनी बारामतीचे पाणी अडवल्याचे सांगून पवार यांनी शिवतारे बारामतीकरांपेक्षा भारी असल्याचेच सांगून टाकले.
पुरंदरचे आमदार बारामतीचे पाणी अडवतात आणि येथे येऊन सांगतात की, मी बारामतीला पाणी देतो. किती थापा हाणायच्या त्याला मर्यादा असतात. आमच्याही काही लोकांना वाटते की, ते आमदार सांगतात म्हटल्यावर काहीतरी होईल. काहीही होणार नाही बाबांनो. अशा भूलथापांना बारामतीकरांनी बळी पडू नये, अशा शब्दांत पवार यांनी शिवतारे यांच्यावर टीका केली. एका ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करताना पवार यांना शिवतारे यांची आठवण का व्हावी याचीच चर्चा पवारांच्या भाषणानंतर रंगली होती.
प्रारंभी राष्‍ट्रवादीशी सलगी असलेले शिवतारे यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर पुरंदरमधून लढवली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला. तेव्हापासून शिवतारे यांनी सातत्याने शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राजकीय नेम धरला आहे. संधी मिळेल तेव्हा या तिघांवर थेट टीका करण्यात शिवतारे कमी पडत नाहीत. यामुळेच सुळे यांच्याबरोबरही त्यांची दोन वेळा जाहीर खडाजंगी झाली होती. अधिक पुढची उडी घेत शिवतारे यांनी गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते. यामुळेच अजित पवारांनी बारामती मतदारसंघातील आपल्या कार्यक्रमाचे निमित्त साधून शिवतारे यांच्यावर जाहीर टीका केल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात होती.
कारखाने उभारण्यासाठी अक्कल लागते
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना मतदारसंघात असलेल्या दत्त शिरोळ साखर कारखान्याची निवडणूक जिंकता येत नाही. शेतक-यांच्या विकासाची कामे केली असती तर ते निवडून आले असते, अशी टीका पवार यांनी शेट्टी यांच्यावर केली. कारखाने अडचणीत आल्यावर वाचवायला ते येणार नाहीत. तो प्रश्न मला सोडवावा लागेल. अव्वाच्या सव्वा मागण्या पूर्ण करताना कारखाने अडचणीत येत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक कारखाने विक्रीसाठी निघाले आहेत. कारखाने उभारण्यासाठी अक्कल लागते; जमीनदोस्त करण्यासाठी नाही, अशी
टीकाही त्यांनी शेट्टी यांच्यावर केली.
‘कोठेही निवडून येऊ शकतो’
धनंजय मुंडेंसह 12 जणांना आमदार केले. मी इतरांनाही आमदार करू शकतो. त्यामुळे महाराष्‍ट्रातून मी कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतो, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेता रविवारी बारामतीत लगावला. काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी पवार यांना बारामती सोडून निवडणूक लढवून दाखण्याचे आव्हान दिले होते. त्यावर पवार यांनी हे आव्हान स्वीकारले. बारामती तालुक्यातील शिरवली येथील विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
बारामतीकरांना चुचकारले
राजकीय प्रवासात बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना भक्कम पाठिंबा दिला म्हणून पवार साहेबांनी भागाचा कायापालट केला. असे असूनही काही जण वीर धरणातील पाणी आणून देतो, असे सांगतात. फलटणचे मालोजीराव राजे निंबाळकर मंत्री असताना वीरचे सगळे पाणी नीरा उजव्या कालव्याला गेले. ते पाणी आपल्याला नाही. असे असताना ते पाणी आम्ही वेगळ्या पद्धीने पावसाळ्यात आपल्याकडे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कर्नाटक, महाराष्‍ट्र, आंध्रचा पाणीप्रश्नावरील वाद तुम्ही बघितला आहे, असे असूनही आज पुरंदर उपसा सिंचन योजना आपण आणली.
अजित पवार, उपमुख्यमंत्री