आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाळके सन्मानित चित्रकर्मींच्या चित्रपटांचे पुण्यात प्रदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारतीय चित्रपटाच्या शताब्दीच्या वाटचालीचे औचित्य साधून आद्य चित्रकर्मी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेल्या चित्रकर्मींच्या चित्रपटांचे विशेष प्रदर्शन रसिकांसाठी करण्याचा उपक्रम वर्षभर होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आशय फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या या उपक्रमाचे उद््घाटन ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते 13 ऑगस्टला होणार आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या सोमवारी सायंकाळी सहा वाजता एनएफएआयच्या थिएटरमध्ये चित्रपट तसेच लघुपट, माहितीपटांचा खजिना रसिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
चित्रपटविश्वातील दादासाहेब फाळके यांचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे 1970 पासून चित्रसृष्टीसाठी विशेष योगदान देणा-या कलाकारांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला. फाळके पुरस्काराच्या पहिल्या मानकरी होत्या बॉम्बे टॉकीजच्या देविकाराणी. प्रस्तुत उपक्रमात प्रारंभी गजानन जहागिरदार दिग्दर्शित ‘ए ड्रीम टेक्स विंग’ हा फाळके यांच्यावरील लघुपट दाखवण्यात येणार आहे. तसेच देविकाराणी यांची भूमिका असणारा ‘अछूत कन्या’ हा चित्रपटही दाखवला जाईल. आजवर 42 कलाकारांना फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांचा समावेश आहे. या सा-यांच्या उल्लेखनीय चित्रकृतींची आठवण सिनेमाच्या शताब्दीनिमित्त पुन्हा उजळेल, असा विश्वास एनएफएआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी व्यक्त केला.
* एनएफएआय, एफटीआयआय आणि आशयचा संयुक्त उपक्रम
* दर महिन्याला एक चित्रपट व लघुपट, माहितीपट
* सर्व उपक्रम चित्ररसिकांसाठी मोफत
* सत्यजित रे, सौमित्र चटर्जी, बी. आर. चोप्रा, यश चोप्रा, हृषीकेश मुखर्जी, तपन सिन्हा, पृथ्वीराज कपूर, सोहराब मोदी, दिलीपकुमार, नितीन बोस आदींचे गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी