आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडूशेठ गणपती दुष्काळी गाव दत्तक घेणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टने 25 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ मंगळवारी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनेही दुष्काळी गाव दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख अशोक गोडसे यांनी दिली. तर भाजप, राष्ट्रवादीच्या आमदारांनीही आपला एक महिन्याचा पगार दुष्काळ निधीसाठी देण्याचे जाहीर केले आहे.

दुष्काळी भागात मदतीसाठी जाणे हे ट्रस्ट आपले कर्तव्यच समजतो. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकारच्या साह्याची गरज आहे, याविषयी शासनाने दगडूशेठ हलवाई ट्रस्टला मार्गदर्शन करावे, अशी आमची विनंती राहील. नुसते टॅँकरने पाणी सोडून वा धान्याची पोती देऊन प्रश्न सुटणार नाही. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी काम उभे करण्यावर ट्रस्टचा विश्वास आहे. त्यामुळे शासनाने अथवा या क्षेत्रातील जाणकारांनी जर काही सूचना ट्रस्टला दिल्या किंवा मार्गदर्शन तत्त्वे दिली तर ट्रस्ट त्वरित त्यांची अंमलबजावणी करेल, असे गोडसे म्हणाले.

योग्य मार्गदर्शनाची गरज
संकटग्रस्त भागात पायाभूत सुविधांची निर्मिती, मुले, कुटुंबे यांच्यासाठी निवारा, गुरांसाठी सोय तसेच इतर काही गोष्टी ट्रस्ट करू शकतो; पण योग्य ते मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे. तसेच ट्रस्ट अन्य गणेश मंडळांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करेल, असे गोडसे यांनी सांगितले.

दुष्काळावरून नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप
दुष्काळाचे राजकारण नको, असे प्रत्येक जण म्हणत असला तरी याच मुद्द्यावर राजकीय नेते एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरोप म्हणत असला तरी दुस-यावर टीका करण्यावाचून त्यांना राहवत नाही, असे दृश्य गेल्या दोन दिवसांत समोर आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीका-टिप्पणी केली आहे.

मदत ही जाहिरातबाजी नाही : आबा
दुष्काळामध्ये सवंग लोकप्रियतेचा मुद्दा उपस्थित करणा-या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनी मंगळवारी चांगलाच टोला मारला. मुख्यमंत्री काय म्हणाले, हे आपल्याला माहीत नाही; पण राजपत्रित अधिका-यानीही आपला एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांना दिला आहे. त्यामुळे ही जाहिरातबाजी नक्कीच नाही, असे गृहमंत्र्यांनी सुनावले. तसेच दुष्काळी दौरे भंपक असतात, असे म्हणणा-या राज ठाकरे यांनाही या वेळी आर. आर. पाटील यांनी सुनावले. आम्ही दौरे केले तरी ते बोलतात, नाही केले तरी बोलतात. मग आम्ही नक्की करायचे काय, असा सवाल त्यांनी केला.

राज यांना गृहपाठाची गरज : मलिक
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, राज ठाकरे हे राजकारणामध्ये अजून विद्यार्थीच आहेत आणि त्यांना अजून गृहपाठ करायची गरज आहे. अभ्यास करूनच त्यांनी कोणतेही वक्तव्य करायला हवे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भंपक घोषणा कोण करतो हे सगळ्यांना माहीत असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांचे एकही आंदोलन आजपर्यंत तडीस गेलेले नाही. राज्य सरकार दुष्काळावर सर्वतोपरी उपयायोजना करत असताना एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून मनसेने काम करावे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांनीही दिले एक महिन्याचे वेतन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी पक्षाचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी एक महिन्याचा पगार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडे जमा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. हा सर्व निधी दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी असेल, असे पिचड यांनी सांगितले.