आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dalit Killing Case : After 30 Hours Furnal The Death Body

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दलित हत्याकांड प्रकरण : तब्बल 30 तासांनंतर मृतदेहवर अंत्यसंस्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - सराईत गुंडाने मंगळवारी जांब (ता. इंदापूर) येथे दिवसाढवळ्या एका दलित युवकाची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्याकांडामुळे गावात दलित संघटना आक्रमक झाल्या असून, आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताचे कुटुंबीय व संघटनांनी घेतला होता. दरम्यान, केंद्रीय अनुसुचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी बुधवारी गावात भेट देऊन आरोपींवर ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर 30 तासांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केल्याच्या रागातून कुख्यात आरोपी सतपाल व त्याच्या पाच साथीदारांनी मंगळवारी चंद्रकांत जयवंत गायकवाड याचा गोळ्या घालून खून केला होता. या हत्याकांडामुळे संतापलेल्या बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यांतील दलित संघटनांनी बुधवारी जांब येथे धाव घेतली होती. आरोपींना तातडीने अटक करावी, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यासाठी रुईच्या रुग्णालयासमोर धरणे देत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. घटनेच्या निषेधार्थ बारामती, इंदापूर, वालचंदनगरमध्ये बंदही पाळण्यात आला.

थूल यांनीही बुधवारी रुई येथे धाव घेऊन दलित संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. विभागीय समाजकल्याण सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनीही त्यांची समजूत काढली व कारवाईचे आश्वासन दिले. तसेच पीडित कुटुंबीयांना 1 लाख 50 हजारांची मदतही देण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी
मृतदेह ताब्यात घेतला.

शासनाची आश्वासने
आरोपींवर कडक कारवाई करू, चंद्रकांतच्या मुलांची शिक्षणाची सोय करणार, पत्नीला नोकरीची हमी, पक्के घर देणार, 5 एकर शेतजमीन देण्यासाठी प्रयत्न, सतपालने धमकी दिलेले वैभव गिते, दादा जाधव यांना व पीडित कुटुंबीयांना तीन महिन्यांसाठी सशस्त्र पोलिस संरक्षण देऊ, असे आश्वासन थूल यांनी दिले आहे.