आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्राॅसिटीच्या समर्थनार्थ मूकमाेर्चा, बारामतीत दलित-बहुजन संघटना रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्चाचे वैशिष्ट्य हे होते की यात महिला आणि तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. - Divya Marathi
मोर्चाचे वैशिष्ट्य हे होते की यात महिला आणि तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.
बारामती  - ‘अॅट्रॉसिटी कायदा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘कोपर्डीतील नराधमांसहित देशातील सर्व बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्या’, ‘कायदे मान्य नाही ताे देशद्राेही अाहे,’ असे फलक हाती घेऊन दलित समाजातील हजाराे लाेकांनी गुरुवारी बारामतीत अॅट्राॅसिटीच्या समर्थनार्थ भव्य मूकमाेर्चा काढला.  प्रांताधिकारी हेमंत नियम यांनी व्यासपीठावर जाऊन निवेदन स्वीकारले.

पुणे जिल्ह्यातून माेठ्या संख्येने लाेक या माेर्चात सहभागी झाले हाेते. दलित समाजातील अथवा इतर समाजातील व्यक्तींकडून अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयाेग हाेत असेल त्याच्यावर खुशाल कारवाई करावी. मात्र अॅट्राॅसिटीला धक्का लावल्यास राज्यात सत्तांतर घडवण्याचा इशाराही माेर्चानंतर देण्यात अाला.  मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाच्या अारक्षण मागणीला पाठिंबाही या वेळी दर्शवण्यात अाला.  डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गुरुवारी सकाळी अॅट्रॉसिटी संघर्ष समितीच्या मूकमाेर्चाला सुरुवात झाली. अत्यंत शिस्तीत निघालेल्या या माेर्चात वकील, उच्चशिक्षित मंडळी सहभागी झाली हाेती. महिलांची संख्याही लक्षणीय हाेती. रिपाइं (अाठवले गट), लहुजी क्रांती सेना अादी दलित संघटनांसह मुस्लिम संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले हाेते. या माेर्चामुळे बारामतीत येणारी वाहतूक पाेलिसांनी काही काळ बंद ठेवली हाेती.  

अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चाचे समन्वयक अॅड. विजय गव्हाळे यांनी माेर्चानंतर मार्गदर्शन केले. ‘अाज राज्यात लाखोंच्या संख्येने माेर्चे निघत अाहेत. ही वादळापूर्वीची शांतता आहे,’ हे सांगताना त्यांनी खैरलांजी प्रकरणापासून ते अाजतागायत घडलेल्या दलित महिलांवरील अत्याचाराचा उल्लेख केला. सरकारवर टीका करताना गव्हाळे म्हणाले,  ‘राज्यातील शेतकरी नेत्यांच्या धोरणामुळे नागवला आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी विवंचनेतून आत्महत्या करत आहेत. त्यासाठी शेतकरी बांधवांना माफक दरात कर्ज, सिंचनाच्या सुविधा तसेच शेतमालाला हमी भाव मिळण्याकडे सरकारने लक्ष द्यावे. आतापर्यंत मराठा समाजातील अनेक मुख्यमंत्री, मंत्री झाले. मात्र या नेत्यांनी समाजातील सामान्य माणसाचे भले केले नाही. जमिनीची विभागणी झाल्याने मराठा समाज अार्थिक संकटात सापडला अाहे. डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांनी दूरदृष्टी ठेवून मागास समाजाला अारक्षण मिळवून दिले. अॅट्राॅसिटी कायदा दलितांसाठी कवचकुंडले अाहेत. हा कायदा नसल्यास दलितांवर अाणखी अत्याचार हाेतील.’  

माेर्चेकऱ्यांच्या मागण्या  
- देशात अॅट्राॅसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा.  
- इतर मागासवर्गीय लोकांवरील अन्याय सुरू आहेत. त्यांचाही अॅट्राॅसिटीत अंतर्भाव करा.  
- अॅट्राॅसिटीच्या प्रकरणांसाठी  विशेष न्यायालये स्थापन करा.  
- मराठा, धनगर, मुस्लिम समाजालाही आरक्षण द्या.  
- कोपर्डीसह देशातील सर्वच बलात्कारी गुन्हेगारांना फाशी द्या.  
- गोरक्षणाच्या नावाखाली बौद्ध, मुसलमान व चर्मकार समाजावरील अत्याचार थांबवा.  
- खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करा.  
- अनुशेष भरून काढा.  
- मागासवर्गीयांची गळचेपी करणारे कायदे रद्द करा.  
- दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्या.

पुढील स्लाइडमध्ये पाहा फोटोज...

बातम्या आणखी आहेत...