आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalit Youth Killed In Indapur Taluka : Criminal Diapper

इंदापूर तालुक्यात दलित तरूणाचा खून : आरोपी फरार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - एका सराईत गुन्हेगाराने पूर्ववैमनस्यातून दलित तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी जांब (ता. इंदापूर) येथे घडली. या आरोपीकडून जीविताला धोका असल्याची तक्रारही मृत युवकाने पूर्वीच पोलिसात दाखल केली होती. मुख्य आरोपी सतपाल महादेव रूपनवर फरार असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आला आहे.
चंद्रकांत जयवंत गायकवाड व त्याचा मित्र दादा जाधव हे दोघे मंगळवारी सकाळी जाधवच्या ढाब्याजवळ थांबले होते. याच वेळी बोलेरो गाडीतून आलेल्या सतपाल व इतर पाच हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर गाडी घालून चंद्रकांतला खाली पाडले व मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून दादा जाधव पळून गेला, तर बचावासाठी आलेल्या दादाच्या आईला ढकलून सतपालने चंद्रकांतवर पाच गोळ्या झाडल्या. डोक्यात दोन, पाठीत दोन व पायावर एक गोळी लागल्याने चंद्रकांत जागीच गतप्राण झाला. त्यानंतर सतपाल गाडीतून फरार झाला.

बाळू ढोरेचा साथीदार
सतपाल कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर खून, दरोडा, गंभीर मारहाण यासारखे असंख्य गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील माहिती अधिकार कायदा कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळू ढोरे याचा तो साथीदार होता. पोलिसांनी सुपे (ता. बारामती) येथे बाळू ढोरे याचे एन्काउंटर केले होते, तेव्हापासून सतपाल स्वतंत्र काम करत आहे.

सतपालने दिली धमकी
चंद्रकांत हा ‘नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस’ संघटनेचा कार्यकर्ता होता. 2011 मध्ये सतपाल व चंद्रकांतमध्ये वाद झाला होता. याच प्रकरणात चंद्रकांतच्या तक्रारीवरून सतपालवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे सतपालचा राग होता. त्याने चंद्रकांतला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे चंद्रकांतने संरक्षण मागितले होते, पण ते मिळाले नव्हते.

मृतदेह घेण्यास नकार
सतपालविरोधात तक्रार देऊनही चंद्रकांतला पोलिस संरक्षण दिले नव्हते. त्यामुळे त्याच्या मृत्यूस पोलिसच जबाबदार आहेत. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत चंद्रकांतचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा दलित संघटनांनी घेतल्याने गावात तणाव होता. रुई (ता. बारामती) येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

आरोपीचे वडीलही गुन्हेगारी प्रवृत्तीचे
सतपालचे वडील महादेव हेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. एका प्रकरणात दादा जाधवच्या तक्रारीवरून त्याने काही महिने तुरुंगवासही भोगला आहे. याचा राग पिता- पुत्राच्या मनात होता. ‘माझा मुलगा तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही’ अशा धमक्या महादेव हा दादा जाधव व त्याच्या नेहमीच आईला द्यायचा.

पोलिसांची दिरंगाई
सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी सतपालला पकडले होते; परंतु वालचंदनगर पोलिसांनी हस्तांतरित करून घेण्यात दिरंगाई केल्याने तो मोकाट सुटला. माझ्यासह वैभव गिते, पांढरे वकील, चंद्रकांत गायकवाड याला सतपालने जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांचीही पोलिसांनी दखल न घेतल्याने चंद्रकांतचा जीव गेला.
दादा जाधव, चंद्रकांतचा मित्र

आरोपी लवकरच शोधू
सतपालविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तूर्त जरी तो फरार झाला असला तरी जास्त काळ तो पोलिसांना चकवा देऊ शकणार नाही. त्याने गोळी घालून एकाची हत्या केली आहे. त्यालाही एक दिवस गोळी खावी लागेल. पोलिस लवकरच त्याला शोधतील.
नामदेव मिठ्ठेवाड, उपअधीक्षक