पुणे - ‘कुटुंब नियोजन, संतती प्रतिबंधक साधने’ या विषयावर समाजात ‘अळीमिळी गुपचिळी’ असताना, हा विषय सोप्या मराठी भाषेत जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी जिवाचे रान करणा-या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका शकुंतला परांजपे यांचे लेखन तब्बल ५८ वर्षांनी वाचकांच्या भेटीला येणार आहे. सोबत शकुंतलाबाईंच्या कन्या आणि ज्येष्ठ चित्रपट-नाट्य लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांचेही लेखन नव्या पुस्तकाच्या माध्यमातून येणार आहे. अशा प्रकारे ‘मायलेकीं’च्या पुस्तकांचे एकत्रित प्रकाशन साहित्यविश्वात प्रथमच घडत असावे.
आज शकुंतलाबाईंच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राजहंस प्रकाशनाच्या दिलीप माजगावकर यांच्याकडे सई परांजपे यांनी या दोन्ही पुस्तकांची लिखित प्रत सुपूर्द केली. १९५७ मध्ये शकुंतलाबाईंनी लिहिलेले ‘माझी प्रेतयात्रा’ हे पुस्तक नव्याने संपादकीय संस्कार करून वाचकांसमोर येईल. तसेच सई परांजपे लिखित पुस्तकही प्रकाशित होणार आहे.
‘मायलेकीं’च्या
ग्रंथप्रकाशनाचा दुर्मिळ योग यातून साधला जाणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मंगला नारळीकर, डॉ. सदानंद मोरे, दिलीप प्रभावळकर, प्रकाशक रामदास भटकळ, समीक्षक डॉ. रेखा इनामदार-साने, विनया खडपेकर, आनंद हर्डीकर, दिलीप माजगावकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
अभिवाचनातून मिळाली झलक
शकुंतला परांजपे यांच्या ‘माझी प्रेतयात्रा’ या मूळ पुस्तकातील याच शीर्षकाच्या लेखाचे अभिवाचन सुदर्शन आठवले (ज्येष्ठ कवी-गीतकार शांताराम आठवले यांचे पुत्र) यांनी केले. स्वत: सई परांजपे यांनी ‘माझी आई’ हा लेख सादर केला.
अभिवाचनातून मिश्कील लेखनशैलीचा प्रत्यय
या अभिवाचनातून शकुंतला परांजपे यांच्या महामिश्कील लेखनशैलीचा प्रत्यय आला. तत्कालीन सनातनी समाजात वावरतानाही एका स्त्रीने कुटुंब नियोजन, संततिनियमन अशा ‘वर्ज्य’ मानलेल्या विषयांवर किती हलक्याफुलक्या पद्धतीने लेखन केले होते, हेही जाणवले. तत्कालीन परंपरा, रूढिग्रस्तता, तथाकथित संस्कृतिरक्षणवाल्यांनी चढवलेले हल्ले, त्याची
शकुंतलाबाईंनी उडवलेली खिल्ली, त्यांचा निर्मळ विनोद यांचाही प्रत्यय आला.