आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या अधिकार्‍याकडून अधिकारी पत्नीचा छळ, लैंगिक शोषण करून बनवला व्हिडिओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नागपूर येथील नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस येथे प्रशिक्षणादरम्यान केरळ येथील एका ‘आयआरएस’ अधिकार्‍याने महाराष्ट्रातील ‘आयआरएस’ अधिकारी असलेल्या महिलेशी मैत्री केली, नंतर लग्नही केले. परंतु कालांतराने विविध वस्तूंची मागणी करून तिचा तो छळ करू लागला. तिचा लैंगिक छळ करून व्हिडिओ क्लिप तयार करण्याची विकृतीही केली. पत्नीच्या तक्रारीनंतर निशांत देवराजन कल्लुलाथिल (32) या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात नागपूर न्यायालयात 375 पानी दोषारोपपत्रही दाखल केले आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील बोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या वडिलांनी निशांतच्या कुटुंबीयांना दहा लाखांचे दागिने लग्नात दिले होते. मात्र त्यानंतरही माहेरहून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, फर्निचर, कार आणण्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. ही मागणी पूर्ण करण्यासाठी निशांतने पत्नीला पोर्न साइट दाखवणे, तिची अश्लील क्लिप तयार करणे, अंगावर कुत्रा सोडणे यासारखी कृत्ये केली. महिला मागासवर्गीय असल्याचे सांगत तिला सासू व नणंदेने स्वयंपाकघर व देवघरातही येण्यास बंदी घातली होती, असे फिर्यादी व साक्षीदारांचे म्हणणे आहे.

निशांत गोव्यात सहायक आयुक्त
निशांत गोव्यातील मडगाव आयकर विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत आहे. त्याच्याविरोधात नागपूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा, माहिती- तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्याची आई रेमालक्ष्मी कल्लुलाथील व नणंद डॉ. रूपा हॅरिस कल्लुलाथील (रा. बंगळुरू) यांच्यावर फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.

पीडितेवर दबावाचा प्रयत्न
महिलेने तक्रार दिल्यानंतर नागपूर पोलिसांनी 20 सप्टेंबर 2012 रोजी निशांतला अटक करून नऊ दिवस पोलिस कोठडीत ठेवले. त्यानंतर त्याची आई व बहीण यांनी पुन्हा असा प्रकार घडणार नाही अशी हमी देत निशांतला जामीन मिळावा याकरिता पीडितेला विश्वासात घेतले. या घटनेनंतर निशांतला सेवेतून सहा महिने निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोघांचीही बंगळुरू येथे बदली झाली. मात्र, तिथेही छळाचे प्रकार सुरूच राहिले. निशांतवरील तक्रार मागे घ्यावी, यासाठी महिलेसह तिच्या आई-वडिलांवर दबाव टाकला जाऊ लागला. केरळमध्ये त्यांच्याविरोधात एक खोटी केसही करण्यात आली.