आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deaf Students News In Marathi, Mobile Digital Planetorium Scheme

राज्यातील कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी मोबाइल डिजिटल प्लॅनेटोरियम योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ज्यांना दिसते पण बोलता किंवा ऐकू येत नाही अशा व्यक्तींसाठी तसेच राज्यभरातील अशा विद्यार्थ्यांपर्यंत खगोलविज्ञानाची माहिती त्यांच्या खुणांच्या भाषेत (साइन लँग्वेज) पोचवण्याचा उपक्रम इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाइल डिजिटल प्लॅनेटोरियम, अशी योजना राबवण्यात येणार आहे.
नेहरू प्लॅनेटोरियमचे संचालक अरविंद परांजपे आणि इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित शेट्ये यांनी ही माहिती दिली. नेहरू तारांगणात नुकताच कर्णबधिरांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आला होता. या वेळी साइन लँग्वेज (खुणांची भाषा) तज्ज्ञ सुनील सहस्रबुद्धे आणि अनुवादक किंजल शहा उपस्थित होते. याप्रसंगी शेट्ये यांनी मोबाइल डिजिटल प्लॅनेटोरियमची संकल्पना मांडली. मोबाइल डिजिटल प्लॅनेटोरियमसाठी इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजीजने पुढाकार घेतला आहे. देशात लाखो व्यक्ती आणि विद्यार्थी मूक-बधिर आहेत. त्यांच्यापर्यंत खगोलशास्त्रातील प्लॅनेटोरियमची संकल्पना पोचणे आवश्यक आहे. डोक्यावर नित्य दिसणार्‍या आभाळात कुठली गुपिते लपली आहेत, आपली ग्रहमाला नेमकी कशी आहे, विश्वाची निर्मिती कशी झाली, त्या ग्रहतार्‍यांचा वेध कसा घेतला जातो, आपले अवकाश संशोधन कशा पद्धतीने काम करते, हे सारे या जिज्ञासूंपर्यंत पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाइल डिजिटल प्लॅनेटोरियम महत्त्वाची भूमिका बजावेल. शिवाय ते फिरते असल्याने ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकेल, असे शेट्ये म्हणाले.
तळागाळात नेले जाईल
मोबाइल डिजिटल प्लॅनेटोरियम साकार करण्यासाठी स्पेशल टेक्निक ऑफ डिजिटल सुपरइंपोझिशनचा वापर केला जाईल. ते देशाच्या अंतर्गत भागातील विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल. अभिजित शेट्ये, व्यवस्थापकीय संचालक, इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजी
‘विध्वंसक ब्रह्मांड’
नेहरू फ्लॅनेटोरियमच्या वतीने नुकताच विध्वंसक ब्रह्मांड (व्हायोलंड युनिव्हर्स) हा कार्यक्रम अभ्यासक, पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली. निरभ्र आकाशात लुकलुकणार्‍या असंख्य तारकांनी भरलेले आभाळ प्रत्यक्षात दिसते तितके शांत नसते. त्यात अनेक घडामोडी सुरू असतात. आपल्या विश्वाची निर्मितीही महास्फोटातून झाली, असे मानले जाते. अशा प्रलंयकारी घडामोडींचा मागोवा या नव्या कार्यक्रमातून घेतला आहे.