आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी साहित्य संमेलनांचे निर्णय २ जुलैला, विशेष बैठकीत ‘प्रायाेजक’ठरणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संमेलनाच्या निमित्ताने परदेशवारी किंवा देशांतर्गत पर्यटनाची सोय करून घेणारे साहित्य महामंडळ विश्व संमेलन आणि साहित्य संमेलनासाठी आता हातघाईवर आल्याचे चित्र आहे. यासंदर्भात दोन जुलै रोजी महामंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विश्व संमेलनाचा मुद्दा ऐरणीवर असेल. त्याचप्रमाणे आगामी साहित्य संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी नेमलेली समिती विविध स्थळदर्शनासाठीचा ‘पाहुणचार’ करून निर्णय घेईल.

आगामी मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निवडणे आणि विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी ‘खर्च’ पेलू शकणाऱ्यांच्या गळ्यात माळ घालण्यासाठी महामंडळ आतूर झाले आहे. त्यामुळे २ जुलैला (गुरुवारी) महामंडळाची विशेष बैठक आयोजिण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अशी आहे समिती
महामंडळ पदाधिकारी आणि कौतिकराव ठाले पाटील, सुरेश नाईक, उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश
जुलै-ऑगस्टमध्ये समिती स्थळांना भेटी देणार
त्याचा अहवाल तयार करणार
सप्टेंबरमध्ये महामंडळाची पुन्हा बैठक
बारामतीकर अाग्रही
अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी अकरा निमंत्रणे आली आहेत. त्यापैकी बारामतीचे निमंत्रण सर्वात ‘वजनदार’ मानले जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधण्याचा बारामतीकरांचा विचार आहे. मात्र स्थळनिवड समिती नेमण्याचा सोपस्कार महामंडळाने आधीच केला आहे. त्यामुळे अकरापैकी काही स्थळांना कात्री लावून काही स्थळांना भेटी देण्याचा उपचारही महामंडळ करणार आहेच. या भेटीगाठींनंतर संमेलनाच्या स्थळाची अधिकृत घोषणा केली जाईल.
दोन निमंत्रणे
विश्व साहित्य संमेलनासाठी एकाच ठिकाणासाठी दोन निमंत्रणे आली आहेत. मात्र त्यापैकी शिवसंघ संस्थेने स्थानिक आयोजनाची संपूर्ण जबाबदारी घेऊ, पण पदाधिकाऱ्यांचे खर्च करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे महामंडळ संस्थेला वाटाण्याच्या अक्षता लावणार हे उघड आहे. एका प्रवासी कंपनीनेही निमंत्रण दिले आहे. त्यांनी खर्चाचा भार उचलला, की महामंडळ लगेच विश्व संमेलनाची घोषणा करणार, हे निश्चित आहे.
महानोरांकडे दुर्लक्ष
अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना विश्व संमेलनासाठीच्या वाऱ्या करू नयेत. केल्या तरी मी अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक ना. धों, महानोर यांच्याकडे महामंडळाने कानाडोळा केला आहे. महानोरांची निवड महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीच विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केली असताना, महानोरांच्या या सल्ल्यावर मात्र महामंडळाने मिठाची गुळणी धरली आहे.
बातम्या आणखी आहेत...