आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युराेपात निर्यात घटल्याने लाल गुलाबाचा रंग फिका, 35 टक्के निर्यात घटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - युरोपीय संघाने आयात धोरणात केलेल्या बदलांचा फटका यंदा व्हॅलेंटाइन डे स्पेशल लाल गुलाबाच्या निर्यातीला बसला आहे. एरवी राज्यातून सर्वाधिक गुलाबांची निर्यात करणाऱ्या मावळ प्रांतातील ३५ टक्के निर्यात यंदा घटली. दरवर्षी दीड कोटी फुलांची होणारी निर्यात यंदा एक कोटीपर्यंत कशीबशी पोहोचली. मात्र याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर अनुकूल होणार असून निर्यातक्षम ६० सेमी आकाराची फुले स्थानिक बाजारपेठांवर राज्य करतील.
 
पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे म्हणाले,‘दरवर्षी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने गुलाबांची माेठी उलाढाल होते. लाल गुलाबाला युरोपात प्रचंड मागणी असते. दरवर्षी सुमारे दीड कोटी गुलाबफुलांची निर्यात मावळ प्रांतातून होते, जी राज्यात सर्वाधिक आहे. यंदा मात्र आयातीसंदर्भातील काही धोरणांचा फटका गुलाब निर्यातीला बसला आहे. जेमतेम एक कोटी गुलाबफुले निर्यात झाली आहेत. ६० सेंमीच्या गुलाबाशिवायची ५० सेंमीची फुले नाकारण्यात आली. फुले हा नाशवंत माल असल्याने हे नुकसान झाले आहे.’  
 
स्थानिक बाजारपेठ यंदा बहरणार   
निर्यात होऊ न शकलेली फुलेही आता स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होणार असल्याने राज्यातील व्हॅलेंटाइन डे मात्र गुलाबाच्या सुगंधाने दरवळणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेसाठी लाल गुलाबांची खरेदी ६ ते ७ रुपये दराने सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना एक फूल ९ ते १० रुपयांना मिळू शकेल. व्हॅलेंटाइनच्या एकाच दिवसात सुमारे ९ ते १० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. निर्यातीत घट झाल्याने यंदा गुलाबांची एकूण उलाढाल २५ ते २७ कोटींपर्यंतच मर्यादित राहिली. गेल्या वर्षी हेच प्रमाण ४० कोटींपर्यंत होते, अशी माहिती रोझ फार्मर्सतर्फे देण्यात आली. 
 
अनुकूल हवामानाचा फुलांना फायदा   
व्हॅलेंटाइन डे हा युरोपात माेठ्या प्रमाणात साजरा हाेताे. त्यामुळे या दिवसासाठी जगभरातून फुलांची आवक होते. पण फुलांचा आकार, रंग, देखणेपणा, दांडीची लांबी, तजेला या सर्व निकषांवर आपली फुले सरस ठरतात. नोव्हेंबरपासून सर्व युरोपीय देशांत बर्फवृष्टी होत असल्याने गुलाबाच्या लागवडीसाठी आणि वाढीसाठी अनुकूलता नसते. आपल्याकडे याच काळात गुलाबासाठी आदर्श हवामान असल्याने आपली फुले बाजी मारतात, अशी माहिती शिवाजी भेगडे यांनी दिली. 
 
आकडे बोलतात   
- एकूण १७०० ते १८०० एकरांवर लाल गुलाबांची लागवड   
- सुमारे अडीचशे शेतकऱ्यांचा सहभाग   
- ५ ते ७ कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून फुलांची निर्यात   
- निर्यातीसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, पॉलीहाऊस, पॅकिंग, स्टोअरेज, कूलिंग आदी सुविधा कंपन्या पुरवतात.   
- २० फुलांचा एक बंच, असे पॅकिंग केले जाते.   
- गुलाबाचे एक झाड ५ ते ६ वर्षे फुले देते   
- स्थानिक बाजारपेठेत, होलसेल विक्री केली जाते 
बातम्या आणखी आहेत...