आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारीसाठी देहू-अाळंदी संस्थानची भांडारगृहे सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आषाढी वारी जवळ आल्याने राज्यभरातील वारकऱ्यांची पावले देहू-आळंदीकडे वळू लागली आहेत. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी देहू-आळंदी सज्ज झाली आहेत. तशीच भक्तांसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्याच्या कामाची पूर्वतयारीही जोमाने सुरू आहे. देहू आणि आळंदी दोन्ही संस्थान कमिट्यांची भांडारगृहे या तयारीत गुंतली आहेत.

संस्थान कमिटीचे सदस्य, जवळचे नातेवाईक, पोलिस कर्मचारी, मानकरी, दिंडीकरी, फडकरी अशा साऱ्यांची दैनंदिन निवास, भोजन व्यवस्था, सोबत रोजचा नैवेद्य, पादुकापूजा अशी व्यवस्था भांडारगृहाकडे असते, अशी माहिती व्यवस्थापक श्रीधर सरनाईक आणि ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

“माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून २८ जून रोजी प्रस्थान करणार आहे. संस्थानच्या स्वत:च्या दिंडीतील सुमारे ४५० जणांची नित्याची सर्व व्यवस्था कमिटीला करायची असते. सध्या सर्व सामानाची जुळवाजुळव सुरू आहे. सुई-दोऱ्यापासून तंबूच्या पालापर्यंत सर्व साहित्य ट्रकमध्ये भरण्यात येते. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी चार तास आधीच पोचून दिंडीच्या मुक्काम, भोजनाची तयारी सुरू करावी लागते. नित्य सेवेकरीही आता या तयारीत गुंतले आहेत, असे वीर यांनी सांगितले.

तुकोबांचा पालखी सोहळा देहू येथून २७ जूनला प्रस्थान करणार आहे. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून भांडारगृहे सुसज्ज करण्यात येत आहेत, असे सोहळाप्रमुख आणि विश्वस्त अशोक मोरे यांनी सांगितले. वारीसाठीचा आमचा शिधा पुण्यात भरला जातो. तेथून पुढे प्रत्येक मुक्कामाच्या जागी निवास, भोजन, न्याहरीची व्यवस्था केली जाते. ३३ आचाऱ्यांची टीम यासाठी काम करते. नैवेद्यासाठी रोजचेच चपाती, भाजी, भात, वरण असे पदार्थ असतात, असे मोरे म्हणाले.

सोहळ्यात ४२७ दिंड्या
संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यात यंदा ४२७ दिंड्या सहभागी हाेणार आहेत. त्यापैकी रथापुढे २७ तर रथामागून २५१ दिंड्या चालतील. नंबर नसलेल्या दिंड्यांची संख्या सुमारे १५० आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यात यंदा ३३० दिंड्या आहेत. त्यामध्ये पालखीपुढे २६ तर पालखीमागे २०४ दिंड्या आहेत.

तुकोबांची पालखी सज्ज
तुकोबांच्या रथाचे व पालखीचे पॉलिशिंग पूर्ण झाले झाल्याची माहिती अशोक मोरे यांनी दिली. माउलींच्या पालखी रथात काही तांत्रिक बिघाड निघाल्याने यंदा जुन्या रथातून माउलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. दर्शनबारी मंडपाची नव्याने उभारणी करण्यात आली असल्याची माहिती अाहे.
बातम्या आणखी आहेत...