आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिने काेमात राहिलेल्या महिलेची प्रसूती; डाॅक्टरांच्‍या प्रयत्नांमुळे जीवदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- तब्बल तीन महिने कोमात राहिलेल्या, मधुमेहामुळे  प्रकृतीच्या गुंतागुंत वाढलेल्या  गर्भवती महिलेची  सुखरूप प्रसूती करण्यात पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील  डॉक्टरांच्या  चमूने यश मिळवले आहे. ही महिला आणि नवजात बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रगती साध्वानी असे या महिलेचे नाव असून ती मूळची बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील आहे.    
 

रूबी हॉलमधील  स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुनीता तांदुळवाडकर म्हणाल्या,‘प्रगतीने गोंडस मुलीला जन्म दिला असून बाळाचे  वजन सव्वादोन किलो आहे. दोघांची प्रकृती चांगली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या  चमूचे हे सामूहिक प्रयत्न आणि यश आहे,”. प्रगतीला आठ वर्षांपासून मधुमेह अाजार हाेता. काही दिवसांपूर्वी ती अचानक बेशुद्ध होऊन पडली. प्रथम तिची वाचा बंद पडली नंतर स्मरणशक्तीही कमी हाेत गेली. त्यामुळे ती अासपासची माणसेही ओळखेनाशी  झाली. गर्भवती अवस्थेत असताना काही दिवसांतच मेंदूमध्ये काही बिघाड झाल्याने कोमात गेली हाेती. सुमारे तीन महिने ती काेमात हाेती.  
 

रूबी हॉल क्लिनिकमध्ये  प्रगती २० मार्च २०१७ रोजी भरती झाली. तिचे वय ३२ वर्षांचे आहे. डॉ. तांदुळवाडकर आणि डॉ. आर. एस. वाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली  वैद्यकीय तज्ज्ञांचा गट तिच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवत होता. ‘हाय डिपेन्डन्सी युनिट’मध्ये  तिला भरती करण्यात आले. तिथे मधुमेहतज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ तिच्या प्रकृतीवर सातत्याने  लक्ष ठेवत होते. तिच्या आहारावर विशेष लक्ष दिले गेले. ८५ दिवसांनंतर प्रगतीने पहिला शब्द उच्चारला. हळूहळू तिला आजूबाजूचे वातावरण, डॉक्टरांच्या सूचना, बाळाचे पोटातील अस्तित्व यांचे भान आले. तिला तीव्र प्रसूतीकळा सुरू झाल्यावर तिची सुखरूप प्रसूती करण्यात यश मिळाले. सुरुवातीचे काही दिवस बाळाला  कुठलाही संसर्ग टाळण्यासाठी विशेष कक्षात ठेवण्यात आले होते. अखेर साडेतीन महिन्यांनंतर प्रगती स्वत:च्या पायांनी चालत बाळाला घेऊन रुग्णालयाच्या  बाहेर आली.   
 
दाेघींना मृत्यूच्या दाढेतून परत अाणले  
प्रगतीचे बंधू केशव मलानी यांनी सांगितले, ‘डॉ. तांदुळवाडकर, डॉ. वाडिया, डॉ. भोसले यांचे आभार कसे मानावेत, हेच समजत नाही. आमच्याकडे तर शब्दच नाहीत. माझी बहीण आणि भाची यांना त्यांनी अक्षरश: मृत्यूच्या  दारातून परत आणले आहे. आम्ही कायमच त्यांचे कृतज्ञ राहू. पंतप्रधान मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आम्ही पत्र पाठवून ‘रुबी’तील  सकारात्मक वैद्यकीय अनुभवाविषयी कळवणार आहोत.    
बातम्या आणखी आहेत...