आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis Give Presentation To Students About Development

निवडणुकीची लगबग : भाजपच्या आधी फडणवीसांनीच सादर केली विकासाची ब्ल्यू प्रिंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट' पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन'च्या साहाय्याने सादर केली. सध्या विविध नेते आणि पक्षांमध्ये राज्याचा विकास आराखडा सादर करण्याची स्पर्धा लागली असताना फडणवीसांनी आपल्या पक्षालाही मागे टाकत वैयक्तिक अजेंडा पुढे रेटल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

‘भक्कम, सशक्त आणि अग्रेसर महाराष्ट्राचे व्हिजन मी तुमच्यापुढे मांडतोय’, असे सांगतानाच ‘भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तुमच्यापुढे आलेलो नाही,' असे फडणवीस यांनी सुरुवातीलाच न विसरता स्पष्ट केले. ‘मुख्यमंत्री कोणी व्हायचे याचा निर्णय नरेंद्र मोदी आणि पक्षाची संसदीय समितीच घेईल. मी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नाही,' असेही त्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांना सांगितले. फडणवीस यांना ऐकण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाचे अ‍ॅम्फी थिएटर खचाखच भरून गेले होते. सभागृहाबाहेरच्या मंडपातदेखील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

महाराष्ट्राचा सुवर्णकाळ
‘सन २०२० मध्ये संपूर्ण जग वार्धक्याकडे झुकलेले असेल तेव्हा राज्याचे सरासरी वय २७ वर्षे असेल. २०१० ते २०३५ या कालावधीत महाराष्ट्र आणि भारत जगातील सर्वाधिक तरुण असतील. याच कालावधीत जगभरातील देशांना कुशल मानवसंसाधन पुरवण्याची जबाबदारी आपण पेलू शकलो तर जागतिक अर्थव्यवस्थेवर राज्य करण्याची संधी भारताला मिळेल. या संधीचा लाभ घेण्यासाठी उच्चशिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अ से फडणवीस म्हणाले.
व्हिजन संकेतस्थळावर, सूचनांचे स्वागत
फडणवीस यांनी शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, अर्थ, सिंचन, नगररचना, करप्रणाली आदी सर्व प्रमुख मुद्द्यांवर मनोगत मांडले. तब्बल दीड तासाच्या या भाषणात कोणतीही राजकीय टिप्पणी करण्याचे मात्र त्यांनी कटाक्षाने टाळले. ‘माझे व्हिजन डॉक्युमेंट अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशनवर आणि माझ्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. त्यावर आपल्या सूचनांचे स्वागत आहे,' असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कुप्रशासनामुळे अधोगती
‘राजकीय लोकांनी काहीच केले नाही तरी महाराष्ट्र फार पुढे जाईल एवढी क्षमता राज्यात आहे. परंतु, राज्यकर्त्यांच्या कुशासनामुळेच महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. भ्रष्टाचार कमी झाला तर महाराष्ट्र देशातच नव्हे, तर जगात अग्रेसर राहील. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन दलित, आदवासी, भटके-विमुक्त, ओबीसी आदींना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही,' असे फडणवीस म्हणाले.
फडणवीसांचे ‘व्हिजन'
सेवा हमी विधेयक : सरकारी कार्यालयांमधील कोणते काम किती दिवसांत व्हावे, याची नियमावली जाहीर करणार. कामे वेळेत पूर्ण न करणा-या सरकारी कर्मचा-याला दंडाची तरतूद.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यावरचे सरकारी नियंत्रण हटवून ते लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत आणणार. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सरकारी मंजुरी घेण्याची गरज पडणार नाही.
शिक्षण : राज्यात स्वतंत्र विज्ञान तंत्रज्ञान खाते स्थापन करणार. बंगळुरूच्या धर्तीवर पुण्याला ‘कॉम्प्युटिंग सेंटर'चा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार.
कृषी खाते : स्वतंत्र अर्थसंकल्प. कोरडवाहू शेतीमध्ये ठिबक सिंचनासाठी ९०% अनुदान. सोलार पंपासाठी अनुदान.
पर्यटन : विकासासाठी एक हजार कोटींची स्वतंत्र तरतूद करण्याचा मानस.
मोदींचा प्रभाव कायम, महायुती तुटणार नाही
‘कर्नाटक आणि पंजाबातील पोटनविडणुकांत काँग्रेसला मिळालेले यश पाहता मोदी लाट ओसरल्याचे मानावे का?’ या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "पोटनविडणुकांच्या निकालावरून महाराष्ट्राचे भवितव्य ठरवता येणार नाही. मोदींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा प्रभाव कायम आहे. महायुतीतचे घटक पक्ष परिपक्व असून जागावाटपावरून महायुती तुटणार नाही, असेही ते म्हणाले.